चौकशी अहवालात धक्कादायक बाबी; काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराला लाखो रुपयांची देयके
जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
धामणगाव रेल्वे : धामणगाव रेल्वे तालुक्यातील गव्हानिपाणी ग्रामपंचायतीत सरपंच, ग्रामसचिव आणि ठेकेदार यांच्या संगनमताने ग्रामपंचायतीचा निधी गैरप्रकाराने खर्च केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यासंदर्भातील चौकशी अहवालात अनेक अनियमितता उघड झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गावातील तक्रारकर्ते प्रमोद बुराडे यांनी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत १५ वा वित्त आयोग अंतर्गत नवीन नाली बांधकाम, पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्ती व नवीन पाईपलाईन तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुतारी दुरुस्ती या तीन कामांमध्ये मोठ्या आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
नाली बांधकामात २८ हजारांहून अधिक रक्कम जादा
चौकशी अहवालानुसार, नवीन नाली बांधकामासाठी तीन लाख रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. हे काम २३ जानेवारी २०२६ रोजी ठेकेदाराला देण्यात आले. मात्र काम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यापूर्वीच ११ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी ९० हजार रुपयांची तीन देयके म्हणजे २ लाख ७० हजार रुपये अदा करण्यात आले. प्रत्यक्षात कामाची पूर्णत्व रक्कम २ लाख ४१ हजार ६८ रुपये असल्याने सुमारे २८ हजार ९३२ रुपये जास्तीचे अदा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा कामातही ३१ हजारांपेक्षा अधिक जादा देयक
पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्ती आणि नवीन पाईपलाईन कामासाठी १ लाख ५३ हजार ६६३ रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. या कामासाठीही ठेकेदाराला एकाच दिवशी ६० हजार रुपयांची तीन देयके देऊन एकूण १ लाख ८० हजार रुपये अदा करण्यात आले. मात्र कामाच्या पूर्णत्वाचा दाखला १ लाख ४८ हजार २०४ रुपयांचा असल्याने ३१ हजार ७९६ रुपये अधिक अदा झाल्याचे चौकशीत समोर आले.
मुतारी दुरुस्ती कामातही अनियमितता
जिल्हा परिषद शाळेतील मुतारी दुरुस्ती कामासाठी १ लाख २९ हजार २६ रुपयांचे प्रकल्प असताना ठेकेदाराला १ लाख २९ हजार ३६१ रुपये अदा करण्यात आल्याचे दिसून आले. या कामातही ३३५ रुपये जादा दिल्याची नोंद आहे.
चौकशी अहवालानुसार, तीनही कामांमध्ये शासकीय कपातीची प्रक्रिया योग्य पद्धतीने करण्यात आली नसून आर्थिक अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच एकूण ६१ हजार ६३ रुपयांची जादा रक्कम वसूलपात्र असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
कामांची प्रसिद्धी न करता ठेकेदाराला थेट काम?
तक्रारीनुसार, संबंधित कामांसाठी आवश्यक जाहिरात किंवा नियमानुसार प्रक्रिया न राबवता परस्पर ठेकेदाराला कामे देण्यात आली. त्यामुळे नियमांना बगल देत मनमानी कारभार झाल्याचा आरोप होत आहे.
या तीन कामांच्या चौकशीत अनियमितता समोर आल्यानंतर गेल्या पाच वर्षांतील ग्रामपंचायतीच्या इतर विकासकामांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
