परतवाडा–परसापूर–धारणी मार्गावर भूस्खलनाचा धोका; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवितास धोका

 

परतवाडा | प्रतिनिधी

परतवाडा–परसापूर मार्गे धारणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून रस्त्याचा काही भाग खचल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी, चारचाकी तसेच प्रवासी वाहनांसाठी गंभीर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर डोंगराळ व घाटमाथ्याचा असल्याने पावसाळ्यात रस्त्याची स्थिती दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहे.

या मार्गावरून मेळघाटातील हजारो आदिवासी बांधव, विद्यार्थी, रुग्ण, शासकीय कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवांची वाहतूक दररोज होत असते. मात्र रस्त्यावरील भेगा, खचलेले कडे, ढासळणारी माती आणि दगड यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित समस्येबाबत अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधूनही सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चिखलदरा यांच्याकडून कोणतीही प्रभावी कार्यवाही करण्यात आलेली नाही. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत असताना अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मेळघाटासारख्या दुर्गम व संवेदनशील भागातील नागरिकांना आधीच आरोग्य, शिक्षण, वाहतूक आणि दळणवळणाच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच मुख्य रस्त्यांची दुरवस्था आणि भूस्खलनाचा धोका वाढल्याने नागरिकांच्या समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहेत.

नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने तांत्रिक पाहणी करून धोकादायक भागात संरक्षक भिंती उभारणे, रस्ता मजबूत करणे, पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करणे, आवश्यक ठिकाणी इशारा फलक व बॅरिकेड्स लावणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.



स्थानिकांच्या मते, वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठा अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती व सुरक्षिततेची कामे हाती घ्यावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post