जळगाव आर्वी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
ग्रामसेवकच ग्रा.प. ला येत नसल्याने कर्मचारीही कुलूप लावून करतात मनमानी
जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
धामणगाव रेल्वे : शासनाने कर्मचाऱ्याचा कामाचा आठवडा अवघ्या ५ दिवसावर आणला असतानाही त्या दिवसामध्ये सुद्दा शासकीय कार्यालये कुलूप लावून दिसत असल्याचे चित्र धामणगाव तालुक्यात दिसत आहे. सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जळगाव आर्वी ग्रा.प. ला रामगाव आणि गंगाजळी या गावाचा समावेश असून कुठलेही शासकीय कागदपत्रे लागल्यास अथवा गावातील समस्याविषयी तक्रार द्यायची असल्यास १० किमी जाऊन ग्रा. प. कार्यालय गाठावे लागते. मात्र केव्हाही गेले कि, ग्रा. प. कार्यालय हे कुलूप बंद असल्याने त्या नागरिकांना वेळ आणि पैशाचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे.
ग्रामसेवक कार्यालयात येतच नसल्याची नागरिकांची ओरड आणि प्रशासकाची कबुली
जळगाव आर्वी येथे ग्रामसेवक गजानन काळमेघ यांची नियुक्ती असून तळेगाव द ग्रा. प. चा सुद्धा पदभार त्यांच्याकडे आहे त्यामुळे पंचायत समितीकडून आठवड्यातील ३ दिवस तळेगाव दशासर आणि २ दिवस जळगाव आर्वी असा त्यांचा उपस्थित राहण्याचा दिवस आहे. ग्रामसेवक कार्यालयात येतच नसल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे. तसेच प्रशासक सत्यभामाताई कांबळे यांनी सुद्धा ग्रामसेवक मागील बरेच दिवसापासून आले नसल्याची कबुली दिली. तसेच ते कधी येतात काही नाही याची कुठलीही माहिती मला देत नसल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांना मलाच जवाब द्यावे लागत असल्याचे म्हणणे आहे. ग्रामसेवक कार्यालयात येत नसल्याने एका निराधार महिलेला सही शिक्क्यासाठी ३ दिवस ग्रा. च्या चकरा माराव्या लागल्याचे सुद्धा प्रशासकांकडून सांगण्यात आले.
ग्रामसेवक येत नसल्याने कर्मचारीही कार्यालयात कुलूप लावून करतात मनमानी
ग्रामसेवकाची कार्यालयात उपस्थिती राहण्याचे दोन दिवस असताना ते येतच नसल्याने त्याचा फायदा आता कर्मचारी सुद्धा घेत आहे. चक्क ग्रा. प. कार्यालयात कुलूप लावून मनमानी कारभार सुरु असल्याचे जळगाव आर्वीत पाहायला मिळत आहे. दरम्यान कर्मचाऱ्याला फोन केला असता फोन सुद्धा उचलत नसल्याची ओरड आहे. वास्तविक पाहता अधिकारी जरी कामानिमित्त दौऱ्यावर गेले असले तरी ग्रा. प. कार्यालय शासकीय वेळेत सुरु असणे बंधनकारक आहे. मात्र जळगाव आर्वीत पूर्णपणे शासकीय नियमाचा फज्जा अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून उडविला जात आहे.
गटविकास अधिकारी ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का ?
जळगाव आर्वीतील ग्राम प. मध्ये अनेक दिवसापासून सुरु असलेला खेळखंडोबा नागरिकांच्या नाकी नऊ आल्याने त्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्याकडे थेट ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्याविरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यावर कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी प्रफुल घोरपडे यांनी तात्काळ ग्रामसेवकांकडून खुलासा मागविण्याची सूचना दिली आहे.
