नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
अकोले तालुक्यातील गणोरे गावचे रहिवासी तसेच संगमनेर तालुक्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्र भूषण कलागौरव पुरस्कार प्राप्त चित्रपट निर्माते काशिनाथ आव्हाड गणोरेकर यांचा बहुचर्चित मराठी चित्रपट 'कुंकू पुसलं कर्जानं' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटामध्ये काशिनाथ आव्हाड गणोरेकर हे प्रथमच गोंधळ्याच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाची सहनिर्मिती जीविका सोनार यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा दाऊद बाबू शेख यांनी सांभाळली आहे. सहदिग्दर्शक म्हणून सागर साठे आणि नंदा बागुल संगमनेरकर यांनी काम पाहिले आहे.
चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये प्रकाश धोत्रे (बाळूमामा फेम), उज्वला पाटील, समृद्धी गटकळ, सेजल सातपुते, प्रसाद कोळी आणि प्रज्ञा गोपाळे यांचा समावेश आहे. चित्रपटाचे पोस्ट-प्रोडक्शनचे काम ऑरेंज म्युझिक स्टुडिओ, नाशिक येथे पूर्ण करण्यात आले आहे.
कर्जबाजारीपणामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाची व्यथा आणि त्यातून निर्माण होणारे भावनिक संघर्ष यावर आधारित असलेला 'कुंकू पुसलं कर्जानं' हा एक हृदयस्पर्शी कौटुंबिक चित्रपट आहे. जीवनातील वास्तव मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेईल, असा विश्वास निर्माते काशिनाथ आव्हाड गणोरेकर यांनी व्यक्त केला.
चित्रपटाचे चित्रीकरण सिन्नर, नाशिक, अकोले आणि गणोरे या विविध ठिकाणी करण्यात आले असून ग्रामीण जीवनातील वास्तव आणि कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या समाजाचे चित्रण यात करण्यात आले आहे.
मीडिया पार्टनर :
डॉ. शाम जाधव (नाशिक), सौ. संगीता मिसाळ (पवार) - अहिल्यानगर, मनीष कांतीलाल मुथा (पत्रकार, नाशिक रोड), प्रवीण मुरलीधर जाधव (सामाजिक कार्यकर्ते), पत्रकार रामभाऊ आवारे (वनसगाव, निफाड - प्रसिद्धी प्रमुख).
"जीवनाची व्यथा आणि कर्जबाजारीपणाची वेदना मांडणारा 'कुंकू पुसलं कर्जानं' हा चित्रपट लवकरच आपल्या सेवेत दाखल होत आहे."

