दोन वर्षांनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दर्यापूर शाखेची नव्याने पुनर्बांधणी

 





अरविंद नळकांडे अध्यक्ष, लता गजभिये कार्याध्यक्ष तर विनोद चोंडके प्रधान सचिव



जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

Amaravati,दर्यापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दर्यापूर शाखेची तब्बल दोन वर्षांनंतर नव्याने पुनर्बांधणी करण्यात आली. साईनगर, दर्यापूर येथे झालेल्या बैठकीत नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. विज्ञाननिष्ठ विचार, संविधान मूल्ये, सामाजिक प्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला अधिक बळकटी देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर होते, तर जिल्हा कार्यवाह (वैज्ञानिक जाणीवा विभाग) नरेंद्र धर्माळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.

अमरावती


उपस्थित कार्यकर्त्यांनी आपला परिचय देत संघटन विस्तार, विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रसार आणि सामाजिक प्रबोधनासाठी राबविण्यात येणाऱ्या भावी उपक्रमांवर चर्चा केली. प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी संघटन बळकटीकरण, गावोगावी शाखा विस्तार, युवक व महिला सहभाग वाढविणे आणि संविधान जागर अभियानाला गती देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच ५, ६ व ७ जून २०२६ रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीची माहिती दिली.


यानंतर दर्यापूर शाखेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार अरविंद नारायण नळकांडे यांची अध्यक्षपदी, सौ. लता धनपाल गजभिये (गणवीर) यांची कार्याध्यक्षपदी, विनोद रामदास चोंडके यांची प्रधान सचिवपदी, सौ. शारदा उत्तमराव ढोके यांची महिला सहभाग विभाग प्रमुखपदी, धनपाल जयपाल गजभिये यांची सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग प्रमुखपदी तसेच गजानन पुंजाजी सरदार यांची संविधान जागर विभाग प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासह काही पदांची निवड पुढील बैठकीत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.



नवनिर्वाचित अध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी संघटनेचे विचार अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्याध्यक्ष लता गजभिये यांनी महिला सहभाग वाढवून विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी प्रभावी उपक्रम राबविण्याची भूमिका मांडली. प्रधान सचिव विनोद चोंडके यांनी संघटनात्मक बांधणी मजबूत करून गावोगावी प्रबोधनपर कार्यक्रम, संविधान जनजागृती आणि युवक सहभाग वाढविण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


नरेंद्र धर्माळे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी विचार आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी सातत्यपूर्ण जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन केले. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून दर्यापूर तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या बैठकीचा समारोप चहापानाने झाला. उपस्थित कार्यकर्त्यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करत आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.


नवनिर्वाचित कार्यकारिणी :


- अध्यक्ष – अरविंद नारायण नळकांडे

- उपाध्यक्ष – रिक्त

- कार्याध्यक्ष – सौ. लता धनपाल गजभिये (गणवीर)

- प्रधान सचिव – विनोद रामदास चोंडके

- महिला सहभाग विभाग प्रमुख – सौ. शारदा उत्तमराव ढोके

- सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग प्रमुख – धनपाल जयपाल गजभिये

- संविधान जागर विभाग प्रमुख – गजानन पुंजाजी सरदार

बैठकीचे संचालन लता गणवीर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद चोंडके यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post