धक्कादायक! पोषण आहाराच्या 'सुकडी'च्या पाकिटात मेलेली बेडकी; गगनबावडा तालुक्यात खळबळ

 



गर्भवती माता व बालकांसाठीच्या पोषण आहाराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह; ठेकेदारावर कारवाईची मागणी


गगनबावडा, प्रतिनिधी :

गर्भवती माता आणि लहान मुलांच्या पोषणासाठी शासनाकडून वितरित करण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना गगनबावडा तालुक्यातील शेणवडे पैकी चौगुलेवाडी येथे उघडकीस आली आहे. अंगणवाडीतून वाटप करण्यात आलेल्या 'सुकडी'च्या पाकिटात चक्क मेलेली बेडकी आढळून आल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत गर्भवती माता तसेच सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहाराचे वाटप केले जाते. यामध्ये डाळ, तांदूळ, तिखट, मीठ आणि सुकडीचा समावेश असतो. चौगुलेवाडी येथील लाभार्थ्याला मिळालेल्या सुकडीच्या पाकिटात मृत बेडकी आढळल्याने हा प्रकार समोर आला.

या घटनेमुळे सरकारी योजनांमधून वितरित होणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बालकांच्या आणि गर्भवती मातांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या योजनेत अशी गंभीर निष्काळजीपणा कसा झाला, याबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्यातील पोषण आहाराचा पुरवठा एकाच ठेकेदारामार्फत होत असल्याने उत्पादन व पॅकेजिंग प्रक्रियेत स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रणाचे निकष पाळले जातात का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post