उत्स्फूर्त उत्साहात संपन्न झाली छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलची ‘मास्टरशेफ स्पर्धा २०२६-२७’

 

महाराष्ट्र, मुंबई

             गाव सहेली नेटवर्क 

मुंबई (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच जीवनोपयोगी कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने दादर येथील छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE Affiliated) तर्फे आयोजित करण्यात आलेली ‘मास्टरशेफ स्पर्धा २०२६-२७’ २४ व २५ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या दोन दिवसीय स्पर्धेला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

उन्हाळ्याच्या सुट्टीचा विधायक उपयोग व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण व्हावी तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी शाळेने विद्यार्थ्यांना महिनाभर विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा सराव करण्यास प्रोत्साहित केले होते. त्याचाच परिपाक म्हणून या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन दादर येथील प्रसिद्ध मामा काणे उपाहारगृहाचे मालक श्रीधर कमलाकर काणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ‘चैतन्य – अस्सल मालवणी भोजनगृह’च्या संचालिका सायली वाळके यांची विशेष उपस्थिती लाभली.

संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच जीवनकौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तर मुख्याध्यापिका सौ. कोमल मॅडम यांनी प्रत्येक विद्यार्थ्यामधील सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शिक्षण अधिक आनंददायी बनविणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

स्पर्धेचे आयोजन एखाद्या टेलिव्हिजन रिअॅलिटी शोप्रमाणे आकर्षक पद्धतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या पाककौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी खाद्यव्यवसाय क्षेत्रातील अनुभवी मान्यवर परीक्षक म्हणून उपस्थित होते.

उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे श्रीधर काणे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पदार्थांतील कल्पकता, मेहनत आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत अशा उपक्रमांमधून जीवनभर उपयोगी पडणारी कौशल्ये विकसित होत असल्याचे सांगितले.

पहिल्या दिवशी ग्रेड ६ च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पोहे व चहा तयार करून उपस्थितांची मने जिंकली.

ग्रेड ६ निकाल : प्रथम – कवीश कोलते
द्वितीय – आदित्य पाटील
तृतीय – अथर्व सुर्वे
उत्तेजनार्थ – पर्व खंडोर

दुसऱ्या दिवशी मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते, लेखक, दिग्दर्शक तसेच ‘पिठी भात’ उपाहारगृहाचे मालक समीर खांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाककौशल्याचे कौतुक करत शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे अभिनंदन केले.

ग्रेड ७ आणि ग्रेड ८ मधील विद्यार्थ्यांनी स्वादिष्ट कटलेट, पराठे आणि चवदार चहा तयार करून परीक्षकांची मने जिंकली.

ग्रेड ७ निकाल : प्रथम – स्वर्णिका सुर्वे
द्वितीय – आराध्या विरले
तृतीय – अवनी राऊळ
उत्तेजनार्थ – श्राव्या पालवणकर

ग्रेड ८ निकाल : प्रथम – गौरी पोतदार
द्वितीय – अजान शेख
तृतीय – आरोही शाह
उत्तेजनार्थ – क्रिशवी पटेल

या स्पर्धेत एकूण ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून २० विद्यार्थ्यांना सहभाग व गुणवत्ता प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

ग्रेड ६ मधील विद्यार्थ्यांनी पोहे व चहा, ग्रेड ७ मधील विद्यार्थ्यांनी कटलेट व चहा, तर ग्रेड ८ मधील विद्यार्थ्यांनी पराठे व चहा तयार करून आपल्या पाककौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला. विद्यार्थ्यांची कल्पकता, सादरीकरण, स्वच्छता, चव आणि आत्मविश्वास यांचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. शिक्षणासोबत जीवनकौशल्यांचा विकास घडवून आणणाऱ्या या अभिनव उपक्रमामुळे छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




Post a Comment

Previous Post Next Post