कायद्याचा गैरवापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन
Wardha : जिल्ह्यात कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप करत वीर अशोक सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकी सवाई (Vicky Sawai) यांनी १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार पोलीस अधिकारी क्षितिज अशोक राव रोकडे यांनी धमकी देणे, सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेणे तसेच मारहाण करणे यांसारख्या गंभीर प्रकारात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज व ऑडिओ रेकॉर्डिंगसह ठोस पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला असून, अद्याप कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले.
पीडित व्यक्तीने या संदर्भात पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर, तक्रारीची प्रत घेऊन वर्धा शहर पोलीस ठाण्यात विधिसम्मत एफआयआर नोंदविण्यासाठी गेल्यावर उलट त्याच व्यक्तीवर खोटी एफआयआर दाखल करून लॉकअपमध्ये टाकण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हा प्रकार संविधान, कायदा व मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या प्रकरणात खालील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे:
क्षितिज अशोक राव रोकडे
पराग पोटे, ठाणेदार, वर्धा शहर पोलीस ठाणे
राम धंगे स्टेशन डायरीमध्ये नमूद घटनेशी संबंधित इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी
प्रमुख मागण्या :
पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ एफआयआर दाखल करण्यात यावी.
संबंधितांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
पीडित व्यक्तीवर दाखल करण्यात आलेली कथित खोटी एफआयआर रद्द करण्यात यावी.
सीसीटीव्ही फुटेज व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
प्रकरणाची चौकशी स्वतंत्र यंत्रणा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी.
प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास न्याय व संविधानाच्या संरक्षणासाठी १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
विक्की सवाई,संस्थापक अध्यक्ष
वीर अशोक सम्राट संघटना, वर्धा
