अमरावती - कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना स्वतःला डॉक्टर म्हणून भासवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरला अमरावती न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र घोगले यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव अविनाश वसंतराव डबले (वय 38, रा. योगीराज नगर, अमरावती) असे आहे. आरोपीने शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील उत्तमनगर भागात ‘सर्वज्ञ हेल्थकेअर फाउंडेशन’ नावाने क्लिनिक सुरू केले होते. दवाखान्यात रिसेप्शनिस्ट, वैद्यकीय उपकरणे आणि डॉक्टरांच्या क्लिनिकप्रमाणे व्यवस्था करून तो रुग्णांवर उपचार करत होता.
याच परिसरात राहणारे डॉ. नितीन रमेश गोंडाणे यांच्या वडिलांवर आरोपी उच्च रक्तदाबावरील उपचार करत होता. 5 मे 2020 रोजी डॉ. गोंडाणे यांनी आरोपीची भेट घेतली असता त्याच्या वैद्यकीय ज्ञानाबाबत संशय निर्माण झाला. पुढील चौकशीत आरोपीकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत प्रमाणपत्र नसल्याचे उघड झाले.
या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सहायक सरकारी अभियोक्ता ज्वाला पांडुरंग जामनेकर यांनी सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
शिक्षेचे स्वरूप
भादंवि कलम 419 अंतर्गत — 2 वर्षे साधा कारावास
भादंवि कलम 420 अंतर्गत — 3 वर्षे सक्तमजुरी
3 हजार रुपये दंड
या प्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजात पोलीस हवालदार अरुण हटवार आणि रुपेश खुरकटे यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.
अमरावती जिल्ह्यात बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांमध्ये हा निकाल महत्त्वाचा मानला जात असून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा संदेश न्यायालयाने दिला आहे.
