तळेगाव दशासर येथील माध्यमिक कन्या विद्यालयाचा इयत्ता १० वी (S.S.C.) परीक्षेचा निकाल यावर्षी अत्यंत समाधानकारक लागला असून विद्यालयाच्या यशात विद्यार्थिनी, शिक्षकवृंद व पालकांचे मोलाचे योगदान राहिले आहे. निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यंदाच्या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट यश संपादन करून विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. विद्यालयातून श्रावणी गजानन शेलोकर हिने ७८.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर श्रुती प्रविण पोकळे हिने ७८.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच वैशाली रामेश्वर मेश्राम (पिंपळखुटा) हिने ७५.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
विद्यालयाच्या निकालामध्ये एकूण ०३ विद्यार्थिनींनी प्राविण्य श्रेणी, १० विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणी, ०७ विद्यार्थिनींनी द्वितीय श्रेणी, तर ०४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तथा कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष, सचिव व इतर सर्व पदाधिकारी तसेच पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालय व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले की, “यश हे मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाचे फळ असते,” आणि विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम व सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
तळेगाव दशासर परिसरात विद्यालयाच्या या निकालाचे सर्वत्र कौतुक होत असून पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Advertisement




