अचलपूर,उपातखेडा : सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत व मेलघाटच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात वसलेली ग्रामपंचायत उपातखेडा ही लोकसहभाग, सुशासन, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, डिजिटल परिवर्तन व शाश्वत ग्रामविकास यांचा प्रभावी संगम साधणारी आदर्श ग्रामपंचायत म्हणून तालुक्यासह जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण करीत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजाचे वास्तव्य असून सुमारे ६० टक्के लोकसंख्या कोरकू आदिवासी बांधवांची आहे. तसेच बलई, गवली, बौद्ध व इतर सर्व समाज घटक एकोप्याने वास्तव्यास असून ग्रामविकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवीत आहेत. सामाजिक सलोखा, लोकसहभाग व सामूहिक विकास हीच ग्रामपंचायतीची मुख्य जमेची बाजू ठरत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय तपासणी समितीने ग्रामपंचायत उपातखेडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन अभियानातील विविध निकषांच्या आधारे ग्रामविकास कामांची सविस्तर पाहणी केली. ग्रामपंचायतीने अभियानातील विविध थीम, उद्दिष्टे व निकषांनुसार नियोजनबद्ध पद्धतीने कामे राबवून सुशासन, आर्थिक स्वयंपूर्णता, जलसंधारण, डिजिटल सेवा, सामाजिक न्याय, हरित ऊर्जा, महिला सक्षमीकरण व लोकसहभाग या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे.
विशेष म्हणजे ग्रामपंचायत उपातखेडाने केवळ शासनाच्या योजनांची अंमलबजावणी न करता स्थानिक भौगोलिक परिस्थिती, ग्रामस्थांच्या गरजा व सामाजिक आवश्यकतांचा सखोल अभ्यास करून गावासाठी उपयुक्त असे स्वतंत्र, नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख उपक्रम राबविले आहेत. “गावाला जे आवश्यक – तेच विकासाचे प्राधान्य” या संकल्पनेतून ग्रामपंचायतीने विकासकामांचे प्रभावी नियोजन केले आहे.
त्यामुळे डिजिटल ग्रामपंचायत, दारूमुक्ती अभियान, “लेकीचे स्वागत” योजना, CFR बांबू व्यवस्थापन, ग्रामीण पर्यटन, हेल्मेट सुरक्षा अभियान, महिला बचत गटांमार्फत रास्त भाव दुकान व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोष खड्डे, डिजिटल शिक्षण, सौरऊर्जा प्रकल्प, निसर्ग निवासी प्रशिक्षण केंद्र, दिव्यांगांसाठी UDID कार्ड नोंदणी व मार्गदर्शन अभियान अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे ग्रामपंचायत उपातखेडा ही इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी विकास मॉडेल म्हणून पुढे येत आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत उपातखेडा, पायविहीर, जांभळा व खतीजापूर या चार गावांचा समावेश असून एकूण लोकसंख्या सुमारे २८०४ आहे. ग्रामपंचायतीस अमृत महाआवास पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, जैवविविधता संवर्धन पुरस्कार तसेच Decentralised Governance Award प्राप्त झाले आहेत.
ग्रामपंचायतीचे प्रमुख उपक्रमांमध्ये डिजिटल ग्रामपंचायत व १५३ ऑनलाइन सेवा, बारकोडयुक्त घरप्लेट व्यवस्था, डिजिटल स्कूल व डिजिटल अंगणवाडी, डिजिटल लायब्ररी, बोलक्या भिंती अभियान, “मेरी पंचायत” ॲप जनजागृती मोहीम, चारही गावांमध्ये सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, “प्रत्येक दुचाकी चालकाला हेल्मेट” सुरक्षा अभियान, महिला बचत गटांमार्फत रास्त भाव दुकान व्यवस्थापन, संपूर्ण दारूमुक्त ग्रामपंचायत, सर्वसमावेशक आरोग्य अभियान, संगणक प्रशिक्षण केंद्र, ग्रामीण पर्यटन व नौकाविहार, CFR बांबू संवर्धन, सामूहिक वनहक्क, जलसंधारण, वृक्षलागवड, सौरऊर्जा प्रकल्प, मनरेगा अंतर्गत रोजगार निर्मिती, PoCRA अंतर्गत हवामान अनुकूल शेती मार्गदर्शन, ग्रामस्वच्छता अभियान व लोकसहभागातून ग्रामविकास यांचा विशेष समावेश आहे.
सुशासन उन्मुख पंचायत अंतर्गत ग्रामपंचायतीने डिजिटल सेवा, ऑनलाइन दाखले, कर नोंदी, अर्ज प्रक्रिया, बारकोडयुक्त घरप्लेट व डिजिटल नोंद प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित केली आहे. स्वतंत्र वेबसाइटच्या माध्यमातून १५३ पेक्षा अधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून नागरिकांना घरबसल्या सुविधा पुरविण्यात येत आहेत.
सक्षम पंचायत संकल्पनेअंतर्गत ग्रामपंचायतीने CSR निधी, लोकवर्गणी, ग्रामसभा निधी, ग्रामीण पर्यटन, निसर्ग निवासी प्रशिक्षण केंद्र व CFR बांबू व्यवस्थापनाद्वारे आर्थिक स्वयंपूर्णतेचा आदर्श निर्माण केला आहे. CFR क्षेत्रातील बांबू संवर्धनामुळे ग्रामसभेच्या उत्पन्नात वाढ होत असून हा निधी ग्रामविकासासाठी वापरण्यात येत आहे.
जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव संकल्पनेअंतर्गत जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोष खड्डे, वृक्षलागवड, मृदसंधारण, जैवविविधता संवर्धन व स्वच्छता अभियानाची व्यापक कामे करण्यात आली आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालय, वैयक्तिक घरे, शेती व जंगल परिसरात सौरऊर्जा प्रकल्प उभारून हरित ऊर्जेचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.
मनरेगा, PoCRA, CSR निधी व विविध शासकीय योजनांचे प्रभावी अभिसरण करत ग्रामपंचायतीने जलसंधारण, रस्ते, नाली, वृक्षलागवड, ग्रामस्वच्छता व रोजगार निर्मितीची मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्ण केली आहेत.
महिला बचत गट, युवक मंडळ, वनसमिती, ग्रामसभा व शाळा व्यवस्थापन समितींना सक्रिय सहभाग देऊन गावस्तरीय संस्थांचे सशक्तीकरण करण्यात आले आहे. तसेच महिला सक्षमीकरण, ग्रामीण रोजगार, बांबू व्यवस्थापन, पर्यटन, संगणक प्रशिक्षण, शेतीपूरक व्यवसाय, UDID कार्ड सुविधा व घरकुल योजनांद्वारे नागरिकांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.
ग्रामपंचायतीने धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण, परिसर स्वच्छता, प्रकाश व्यवस्था व मूलभूत सुविधा उपलब्ध करून सामाजिक सलोखा व सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ केली आहे. लोकसहभाग व श्रमदान हा ग्रामविकासाचा मुख्य आधार ठरला असून ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळ व ग्रामसभा यांच्या संयुक्त सहभागातून जलसंधारण, वनसंवर्धन, वृक्षलागवड व ग्रामस्वच्छतेची अनेक कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत.
तालुकास्तरीय तपासणी समितीसमोर ग्रामपंचायत उपातखेडा येथे राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण, लोकाभिमुख व शाश्वत विकासात्मक उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. ग्रामपंचायतीने सुशासन, डिजिटल परिवर्तन, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, हरित ऊर्जा, ग्रामीण पर्यटन, लोकसहभाग, सामाजिक सलोखा व आर्थिक स्वयंपूर्णता या सर्व निकषांवर उत्कृष्ट कार्य सादर केल्याने सदर ग्रामपंचायत अभियानातील पारितोषिक पटकावणार का, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
तसेच समितीमार्फत करण्यात आलेले प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण, दस्तऐवज पडताळणी, ग्रामस्थांचा सहभाग व विविध विकासकामांची गुणवत्ता पाहता ग्रामपंचायत उपातखेडा ही तालुक्यासह जिल्हास्तरावर विशेष ठसा उमटविणारी ग्रामपंचायत ठरत असून, अंतिम निकालामध्ये समिती कोणता निर्णय घेते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
तालुकास्तरीय तपासणी समितीने ग्रामपंचायत उपातखेडा येथील कार्य हे “सुशासन, लोकसहभाग, डिजिटल परिवर्तन, पर्यावरण संवर्धन, महिला नेतृत्व व शाश्वत ग्रामविकास” यांचे प्रेरणादायी मॉडेल असल्याचे गौरवोद्गार व्यक्त केले.
यावेळी सरपंच अमिताब बलिराम सोनारे यांनी ग्रामपंचायतीच्या विकास प्रवासात मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती अचलपूर, विस्तार अधिकारी पंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा प्रशासनाचे लाभलेले सहकार्य, मार्गदर्शन व भक्कम पाठबळ याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रशासनाच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे व सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे ग्रामपंचायतीला अनेक नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख विकासात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविता आल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपसरपंच रविंद्र गणपत येवले, ग्रामसेवक कु. के. जे. मार्को, सर्व सदस्य, महिला बचत गट, युवक मंडळ, वनसमिती तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

