मालेगाव : मालेगाव नगर परिषदेतील कथित बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात तक्रारदाराची ओळख उघड केल्याचा आरोप करत, आरटीआय कार्यकर्ते कैलास बन्सोड यांनी मुख्याधिकारी सतीश शेवता यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी वाशिम पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, मालेगाव शहरातील गट क्रमांक १५६ येथील कथित बेकायदेशीर बांधकामाबाबतची तक्रार ८ एप्रिल २०२६ रोजी नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र, तक्रारीची गोपनीयता राखण्याऐवजी संबंधित व्यक्तीस पाठविण्यात आलेल्या पत्रात तक्रारदाराचे नाव उघड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कैलास बन्सोड यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, Whistle Blowers Protection Act, 2014 च्या कलम १६ नुसार तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर ओळख उघड करून कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर कलम १७ अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली असून, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी विनंती पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
