श्याम जाधव प्रतिनिधी
नाशिक, दि. ३ एप्रिल २०२६ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाशिक येथील खुटवड नगरमधील सिटू कामगार भवन येथे फलज्योतिष व बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद उत्साहात पार पडली. सकाळी ९.३० ते सायं. ५.३० या वेळेत आयोजित या राज्यस्तरीय परिषदेत विविध जिल्ह्यांतील कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजप्रबोधन कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या परिषदेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर उपस्थित होते.
नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात बुवाबाजीचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. महिलांचे लैंगिक, आर्थिक, मानसिक व भावनिक शोषण, फसवणूक आणि लुबाडणुकीचे प्रकार उघडकीस येत असल्याने समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी परिषदेची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमात कॉ. डी. एल. कराड (नाशिक) यांनी मनोगत व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रात “असे कसे झाले भोंदू” या विषयावर प्राचार्य डॉ. नितीन शिंदे (संपादक, अंनिस, इस्लामपूर) यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष दादा चांदणे (सोलापूर) होते.
तिसऱ्या सत्रात “बुवाबाजी विरोधी संघर्ष : गुन्हे, तपास, कायदा व मनस्वास्थ्य” या विषयावर सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त बाबासाहेब बुधवंत (अहिल्यानगर), अॅड. रंजना गवांदे (संगमनेर) आणि मनोविकार तज्ञ डॉ. जयंत ढाके (नाशिक) यांनी सविस्तर मांडणी केली.
परिषदेच्या समारोपापूर्वी शहरातून बुवाबाजीविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. समारोपीय सत्रात “बुवाबाजी विरोधी निर्धार” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व लेखक उत्तम कांबळे (नाशिक) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे (लातूर) होते.
या परिषदेतून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे, अंधश्रद्धा व बुवाबाजीविरोधात जनजागृती करणे तसेच विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक कार्य अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातही बुवाबाजीविरोधी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी अधिक सक्रियपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
