अंधश्रद्धेच्या अंधारातून विवेकाच्या प्रकाशाकडे
मानवाच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर अंधश्रद्धेची मुळे भीती, अज्ञान आणि असुरक्षिततेच्या भावनेत दडलेली दिसतात. आदिमानव जेव्हा गुहेत राहत होता, तेव्हा निसर्गातील वीज, वादळ, रोगराई किंवा मृत्यू यांसारख्या अनाकलनीय घटनांनी त्याला भयभीत केले. त्या अज्ञात शक्तींना शांत करण्यासाठी त्याने प्रार्थना, विधी आणि विविध श्रद्धांचा आधार घेतला. त्या काळी ते स्वाभाविकही होते, कारण विज्ञान आणि तर्कशास्त्राची साधने त्याच्याकडे नव्हती.
कधी एखादा योगायोग घडला आणि संकटातून सुटका झाली, की त्या योगायोगामागे एखाद्या अदृश्य शक्तीचा हात आहे असा समज निर्माण झाला. काही घटना जुळून आल्या की त्यांना कारण-परिणामाचा संबंध जोडला गेला. हळूहळू त्या समजुती प्रथा बनल्या आणि प्रथा परंपरेत रुपांतरित झाल्या. अशा प्रकारे अंधश्रद्धेचे चक्र समाजात फिरू लागले.
काळ बदलला, समाज प्रगत झाला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवी जीवनात क्रांती घडवली; पण अंधश्रद्धेची सावली पूर्णपणे नाहीशी झाली नाही. उलट ती अनेकदा नव्या रूपात समाजात पसरताना दिसते. आजही अनेकांना भविष्य जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता असते. अनिश्चिततेच्या भीतीमुळे माणूस अशा गोष्टींच्या मागे लागतो ज्या त्याला खोटा दिलासा देतात.
याच मानसिकतेचा फायदा घेऊन बुवाबाजी, तंत्र-मंत्र आणि फलज्योतिष यांसारख्या गोष्टी समाजात बळावतात. ग्रह-तारे, राशी, जन्मतारीख यांवरून माणसाचे संपूर्ण आयुष्य ठरते असा दावा केला जातो. परंतु वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर या दाव्यांना ठोस पुरावे नाहीत. तरीही अनेक लोक भविष्य जाणून घेण्याच्या मोहात या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि नकळतपणे परावलंबी बनतात.
अंधश्रद्धा सुरुवातीला साध्या वाटणाऱ्या गोष्टींपासून सुरू होते—मांजर आडवे गेले म्हणून काम थांबवणे, काही दिवस “अशुभ” मानणे, ग्रहबाधा दूर करण्यासाठी विविध उपाय करणे. पण हीच मानसिकता पुढे वाढत गेली की ती धोकादायक वळण घेते. लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक, मानसिक आणि भावनिक लुबाडणूक केली जाते. काही वेळा तर अंधविश्वासाच्या नावाखाली अमानवी आणि गुन्हेगारी प्रकारही घडतात.
परंतु भारतीय समाजात विवेकाचा आवाज नेहमीच उठत राहिला आहे. आपल्या संतपरंपरेने शतकांपूर्वीच अंधविश्वासाला आव्हान दिले. संत तुकाराम, संत जनाबाई यांसारख्या संतांनी कर्मकांडापेक्षा विवेक, माणुसकी आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. त्यांनी भक्ती म्हणजे आंधळा विश्वास नसून सत्य, प्रामाणिकपणा आणि माणसांवरील प्रेम आहे, हे समाजाला शिकवले.
हा विचार पुढे संत गाडगेबाबांनी कृतीतून समाजात रुजवला. त्यांनी गावोगावी फिरून स्वच्छता, विवेक आणि सामाजिक जागृतीचा संदेश दिला. भोंदूगिरी आणि आंधळ्या धार्मिकतेवर त्यांनी कठोर प्रहार केला. देव शोधायचा असेल तर तो माणसाच्या सेवेत आहे, भीती दाखवून लोकांना फसवणाऱ्या शोषण करणाऱ्या भोंदूंच्या जाळ्यात नव्हे—हा त्यांचा स्पष्ट संदेश होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचारांची दिशा दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की समाज प्रगत व्हायचा असेल तर अंधश्रद्धा, दैववाद आणि अन्यायकारक परंपरा यांना प्रश्न विचारणे आवश्यक आहे. शिक्षण, समता आणि विवेक यांच्या आधारावरच खऱ्या अर्थाने मुक्त आणि प्रगत समाज उभा राहू शकतो.
आज शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवले जाते; पण “विचार कसा करावा” हे शिकवणारा चिकित्सक दृष्टिकोन अजूनही शिक्षणात पुरेशा प्रमाणात दिसत नाही. केवळ पदवी मिळाल्याने विवेक तयार होत नाही. प्रश्न विचारण्याची सवय, पुराव्यांवर विश्वास ठेवण्याची वृत्ती आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे.
आज अंधश्रद्धेमुळे होणारे शोषण केवळ एखाद्या गावापुरते मर्यादित राहिलेले नाही. देशात आणि जगभरातही आर्थिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकाची गरज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची झाली आहे.
माणसाने जर साधा तर्क वापरला, पुराव्यावर विश्वास ठेवला आणि विवेकाला मार्गदर्शक मानले, तर अंधश्रद्धेची साखळी आपोआप तुटू शकते. जीवनात दिसणारे अनेक “चमत्कार” हे प्रत्यक्षात अज्ञानामुळे निर्माण झालेले भास असतात. विवेकाचा प्रकाश पडला की ते भास नाहीसे होतात.
म्हणूनच आज काळाची गरज आहे ती भीतीच्या अंधारातून बाहेर पडून विज्ञान, विवेक आणि माणुसकीच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याची. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला तरच अंधश्रद्धेचे जाळे कमकुवत होईल आणि माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र, स्वाभिमानी आणि जागरूक नागरिक म्हणून उभा राहील.
प्रफुल्ल मंदा श्रीधर
अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
