छायाचित्र ईलीयास बावानी माहूर
माहूर | मराठवाडा संपादक अनिल बंगाळे
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहन (ई-व्ही) चार्जिंग स्टेशन उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत माहूर तहसील कार्यालयातही इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेमुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत जगताप यांनी दिली.
माहूर हे श्री रेणुकामाता देवी मंदिर या प्रसिद्ध धार्मिक स्थळामुळे राज्यातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर माहूर येथे उपलब्ध झालेली ही सुविधा भाविक आणि पर्यटकांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटन सुविधांमध्येही भर पडणार आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, जागतिक स्तरावरील ऊर्जा संकटे आणि बदलत्या परिस्थितीमुळे पर्यायी व स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा वेळी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधांचे जाळे उभारणे ही काळाची गरज असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची ही संकल्पना दूरदर्शी व अभिनंदनीय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या उपक्रमामुळे हरित ऊर्जा, प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना चालना मिळणार असून, जिल्हा प्रशासनाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.
