लाडक्या बहिणींच्या प्रलंबित प्रश्नांसाठी १ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

 


लाडक्या बहिणींच्या प्रलंबित प्रश्नांसाठी १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन; उपस्थित राहण्याचे आवाहन


जिल्हा विशेष प्रतिनिधी / सुनिल धुर्वे 

यवतमाळ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या विविध समस्या अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन १ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार असून जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ज्या महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. तसेच अनेक महिलांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने किंवा लिंकिंगसंबंधी तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होत नसल्याच्या तक्रारीही आंदोलनाद्वारे मांडल्या जाणार आहेत.


या आंदोलनात लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्याची मागणी करण्यात येणार असून, शासनाने संबंधित महिलांना न्याय द्यावा, अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.


या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) युवा जिल्हाध्यक्ष संकेत टोपे करणार असून, युवती कार्याध्यक्ष मनीष काटे (भोसले) तसेच शांतता समिती जिल्हा सदस्य व पोलीस मित्र जावेद भैया काझी यांनी जिल्ह्यातील महिलांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Ladki bahin


आंदोलनासाठी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी आपले प्रश्न आणि मागण्या घेऊन १ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post