बकरी ईद रक्तदान सप्ताहाचे दुसरे वर्ष उत्साहात संपन्न

 



तळपत्या उन्हात 38 पेक्षा अधिक रक्तदात्यांचे रक्तदान; एव्हरेस्टवीर अशोक मुन्ने यांच्या उपस्थितीने शिबिराला प्रेरणादायी रंग



जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

अमरावती : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती व बडनेरा शाखेच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईद / ईद-उल-अजहा सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर बुधवार दि. 27 मे 2026 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अमरावती येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.


“मुक्या प्राण्यांची कुर्बानी न देता… मानवतेसाठी रक्तदान करूया!” हा सामाजिक संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक, युवक व रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तळपत्या उन्हाची पर्वा न करता 38 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले. अनेक युवकांनी प्रथमच रक्तदान करून मानवतेप्रती आपले कर्तव्य बजावले.

बकरी ईद रक्तदान सप्ताहाचे हे दुसरे वर्ष असून समाजात मानवता, बंधुता व सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.


या शिबिराचे प्रमुख आकर्षण ठरले “One-Legged Wonder of India” म्हणून देशभर ओळख असलेले एव्हरेस्टवीर अशोक मुन्ने यांची प्रेरणादायी उपस्थिती. कठीण परिस्थितीवर मात करून एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्यांच्या जीवनप्रवासाने उपस्थित युवकांना जिद्द, संघर्ष आणि समाजसेवेची प्रेरणा दिली. विशेष म्हणजे रक्तदान शिबिराची सुरुवात स्वतः अशोक मुन्ने, वैभव भोंडे, सचिन खोब्रागडे व रेहमान शहा यांनी रक्तदान करून केली. त्यानंतर मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाला मा. डॉ. सतीश तराळ, प्रमोद कोळमकर (उपाध्यक्ष, महा. अंनिस अमरावती), मा. रजियाताई सुलताना (लेखिका व समाजसेविका), मा. अजय साखरे (अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती), सुभाष गौरखेडे, विजय डवरे (जिल्हा प्रधानसचिव, महा. अंनिस अमरावती), मा. मो. अफसर भाई (जिल्हा कार्यवाह, बुवाबाजी विभाग अमरावती), रेहमान शहा (शाखाध्यक्ष, बडनेरा शाखा), वि. दा. पवार (उपाध्यक्ष, शहर शाखा अमरावती), हर्षा सगणे (अध्यक्ष, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन), मा. विजया घोडेस्वार (बडनेरा शाखा कार्यवाह, संविधान जागर विभाग) तसेच मोनाली सदावर्ते (सर्पमित्र व प्राणीमित्र) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी 40 पेक्षा अधिक पुस्तके लेखन करणाऱ्या मा. रजिया सुलताना यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल, एव्हरेस्टवीर अशोक मुन्ने यांचा प्रेरणादायी कार्याबद्दल तसेच जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे यांचा रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

रक्तदाते व उपस्थितांना संविधान, पर्यावरण जनजागृती विषयक पुस्तिका वितरित करण्यात आल्या, तर प्रमुख अतिथींना “शिवाजी कोण होता?” ही पुस्तिका भेट देण्यात आली. सहभागी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रफुल्ल मंदा श्रीधर, नरेंद्र धर्माळे, सुभाष गौरखेडे, विजय डवरे, दिलीप लाडे, सचिन खोब्रागडे, मंजू वासनिक, वर्षा गावंडे, आशिष देशमुख, निखिल विल्हेकर, शुभम डाबेराव, जय करोले, विजया करोले, वैभव भोंडे, रवींद्र फुले, मनिष गणेशपुरे, अभिजित कणसे, मनीष पाटील, मयूर विघे, अनुप खोब्रागडे, निकिता खोब्रागडे, राखी ससाणे, कांचन बाजोरिया, मीनाक्षी इंगळे, श्वेता बारड, सीमा गणेश मेश्राम, कुर्वे सर, मनीषाताई अनिल काळे, कांचनताई, खलील शहा तसेच महा. अनिस अमरावती, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट अमरावती, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, संविधान जागर अभियान व समविचारी संघटना यांनी विशेष परिश्रम घेतले.


विशेषतः कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व संचालन यासाठी सचिन खोब्रागडे, दिलीप लाडे, मंजू वासनिक आणि विजया करोले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.


तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार व रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. आशिष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, समुपदेशक योगेश पानझाडे, परिचारिका संगीता गायधने, श्री. गजानन इंगळे व रक्तपेढी विभागातील कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश समाजात पोहोचवत गरजू रुग्णांच्या जीवनासाठी प्रत्येकाने रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post