सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने मुंबईत भव्य झोनल कमर्शियल कॉन्फरन्स संपन्न

 

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ



गाव सहेली नेटवर्क, मुंबई 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील ऑडिटोरियममध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (CRMS) वतीने भव्य झोनल कमर्शियल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला मध्य रेल्वेच्या विविध विभागांतील वाणिज्य विभागातील कर्मचारी, तिकीट तपासनीस, बुकिंग स्टाफ तसेच आरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्साहात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.


या परिषदेला CRMS चे अध्यक्ष तथा NFIR चे संयुक्त महामंत्री डॉ. प्रवीण बाजपेयी यांनी अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी आपल्या भाषणात वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसमोर सविस्तरपणे मांडल्या. रेल्वे प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देताना कर्मचारी अत्यंत कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावत असून, त्यानंतरही त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


डॉ. बाजपेयी यांनी सांगितले की, रेल्वेच्या महसूल वाढीत कमर्शियल विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका असूनही या विभागातील कर्मचाऱ्यांना अनेक विसंगतींना सामोरे जावे लागत आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांवरील अनावश्यक दबाव, तिकीट खिडक्यांवरील QR पेमेंट अयशस्वी होण्याच्या समस्या, खराब प्रिंटर, टीसी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, जर्जर खुर्च्या, मूलभूत सुविधांचा अभाव, महिला कर्मचाऱ्यांच्या अडचणी तसेच प्रवाशांकडून दाखल होणाऱ्या खोट्या FIR मुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याचे गंभीर मुद्दे त्यांनी उपस्थित केले.


या परिषदेला मध्य रेल्वेचे CCM (PM) डॉ. सुमंत देऊलकर, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. शिवराज मानसपुरे, Sr. DCM (Works) प्रकाश कनोजिया यांच्यासह अनेक वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय एस. एम. शुक्ला यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर या सर्व मंडळांतील प्रतिनिधींनी परिषदेत सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या योग्य व न्याय्य असल्याचे मान्य करत लवकरात लवकर त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.


मुंबई मंडळाचे सचिव संजीव कुमार दुबे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. कमर्शियल कॅडरच्या समस्यांना मुखरपणे मांडण्याचे कार्य CRMS चे उपाध्यक्ष संजीव कुमार दुबे यांनी केले.


यावेळी कार्यकारी अध्यक्ष व्ही. के. सावंत, राम खापटे, महामंत्री अनिल कुमार दुबे, उपाध्यक्ष विवेक सिसोदिया, संयुक्त महामंत्री धर्मेश कर्दम, जमील खान, सचिव राजकुमार, अमीर खान, डी. व्ही. रमण, जोनल मीडिया सल्लागार आर. बी. चतुर्वेदी, सुनील मिश्रा, एस. पी. सिंह, बागेबाडी, राकेश तसेच जोनल महिला अध्यक्षा छाया शेलके यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post