श्रीक्षेत्र माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती (गुरु प. पू. अच्युत भारती महाराज) (वय ९५) यांचे शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सायं. ५ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने माहूरसह संपूर्ण धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली असून असंख्य भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत.
हिंदू धर्मपरंपरेनुसार त्यांनी काही दिवसांपासून प्रयोपवेशन (संकल्पपूर्वक देहत्यागाची साधना) स्वीकारून आपल्या इहलोकातील प्रवासाची सांगता करण्याचा संकल्प केला होता, अशी माहिती समोर येत आहे.
सन १९७८ मध्ये त्यांचे गुरु प. पू. अच्युत भारती महाराज वैकुंठवासी झाल्यानंतर विधिवत परंपरेनुसार प. पू. मधुसूदनजी भारती महाराज यांची श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीवर नियुक्ती करण्यात आली होती. तब्बल चार तप (सुमारे ४८ वर्षे) त्यांनी या गादीवर विराजमान राहून कठोर तपश्चर्या, साधना व धर्मसेवा केली.
त्यांच्या साधेपणामुळे, आध्यात्मिक तेजामुळे आणि भक्तांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे ते सर्वांच्या आदराचे केंद्र होते. त्यांच्या जाण्याने श्री दत्त शिखर संस्थानची मोठी आध्यात्मिक पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात असंख्य शिष्य, भक्तपरिवार व धर्मप्रेमी नागरिक असा मोठा परिवार आहे.



