२२ वर्षांच्या देशसेवेचा मान राखत राजेश टेकाम यांचा सन्मान
मूर्तिजापूर - महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना (DNE 136) तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला यांच्या वतीने २२ वर्षे अविरत देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या राजेश हरीचंद्र टेकाम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी वैशाली मडावी, ग्रामपंचायत अधिकारी, यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात शाल, श्रीफळ व बुका देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष देवानंद डोंगरे यांनी प्रास्ताविकात सैनिकांचे राष्ट्रनिर्मितीत असलेले महत्त्व अधोरेखित करत “सैनिकांच्या अविरत सेवेमुळेच देशातील नागरिक सुरक्षित आहेत,” असे मत व्यक्त केले.
यानंतर संघटनेचे सचिव सुनील मानकर तसेच अमितकुमार कुरुमकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत टेकाम यांच्या सेवाभावाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन संदीप गाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऋषिकेश अंभोरे यांनी मानले.
या प्रसंगी गोवर्धन जाधव, गजानन भुस्कुटे, बाळासाहेब भोरकडे, करुणा वानखडे, जोशना उमाळे, भारती धुके, स्नेहल घुर्डे, भारत भोरकडे, दीपक मते, विकास गावंडे, रोहित इंगळे तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

