उपक्रमशील शिक्षक निलेश भारसाकळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Aknews




विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे सन्मान

Gavakadachibatmi Village news


मूर्तिजापूर - तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दताळा येथील प्रभारी मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक निलेश नारायणराव भारसाकळे यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २९ मार्च २०२६ रोजी पुणे येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात प्रदान करण्यात आला.

“विद्यार्थीच माझे दैवत” या ब्रीदवाक्याचा अवलंब करत भारसाकळे यांनी विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धती राबवली आहे. स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंट पॅटर्नच्या तोडीचे शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. चिल्ड्रेन बचत बँक, एक तास वाचन, सुंदर अक्षर अभियान तसेच ध्वनी प्रसारकाच्या माध्यमातून इंग्रजी परिपाठ अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून डिजिटल माध्यमातून शिक्षण देणे, शैक्षणिक साहित्य निर्मिती, आकर्षक वर्ग सजावट आणि अध्यापनातील प्रामाणिकता यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढवली आहे. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक आणि गावकऱ्यांमध्ये त्यांना विशेष आदराचे स्थान प्राप्त झाले आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत शिक्षक मित्र, केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले असून, या सन्मानामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली आहे. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post