उन्नत भारत अभियानांतर्गत विविध विभागांची सेवा; गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन
मूर्तिजापूर - तालुक्यातील गट ग्रामपंचायत हिवरा कोरडे येथे ‘गाव आरोग्य संपन्न गाव’ व ‘उन्नत भारत अभियान’ अंतर्गत गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी स्व. आबासाहेब कोरडे सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. राजेश रामदासजी कांबे आयुर्वेद कॉलेज व मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, तुरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिराला गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून एकूण १४४ रुग्णांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला. शिबिरात शस्त्रक्रिया विभाग, नेत्र तपासणी, दंत तपासणी, कान-नाक-घसा तसेच हाडांच्या विकारांची तपासणी व उपचार करण्यात आले.
शिबिरात डॉ. आश्विन इंगळे (एम.एस. जनरल सर्जन), अनिल सोनोने (ऑप्थॅल्मोलॉजिस्ट असिस्टंट), रमेश चव्हाण (जनसंपर्क अधिकारी) व सोनू शेख (ड्रायव्हर) यांनी सेवा दिली. गावाचे सरपंच वैभव कोरडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
हनुमान मित्र मंडळ, हिवरा (कोरडे) यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचा वाटा उचलला. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनीही सक्रिय सहभाग नोंदवत रुग्णसेवा केली.
गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना पुढील तपासणी व शस्त्रक्रियेसाठी तुरखेड येथील महाविद्यालयात येण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
शेवटी ऋषिकेश कोरडे यांनी सर्व वैद्यकीय पथक व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानून शिबिराची सांगता केली.

