Gavakadachibatmi | ईद मिलन सोहळा उत्साहात संपन्न

 

Batmigavakadachi





अमरावती : “सबके लिए खुला है मंदिर यह हमारा, आओ कोई भी धर्मी आओ कोई भी पंथी” या राष्ट्रसंतांच्या समतेचा संदेश देणाऱ्या विचारांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेला ईद मिलन सोहळा सर्वधर्म समभाव, हिंदू–मुस्लिम ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेचा संदेश देत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

राधानगर येथील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविधान जागर अभियान आणि जमात-ए-इस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सतीश तराळ होते. तर उद्घाटक म्हणून गाडगेनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दिलीप काळे (संत गाडगेबाबा अध्यासन प्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ) उपस्थित होते.

यावेळी मेहराज खान (सामाजिक कार्यकर्ते), अनिला काझी (कार्यकारी सदस्य, अंजुमन मुस्लिम ख्वातीन), नजमा काझी (क्रांती नवनिर्मिती संघटन), ज्योती राठोड (आधार बेघर निवारा), तसेच मिर्झा गफ्फार बेग, रफिक अहमद (जमात-ए-इस्लामी हिंद), याह्या खान पठाण (सामाजिक कार्यकर्ते) आणि राजीव बसवनाथे (जिल्हा कार्यवाह, संविधान जागर विभाग – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेरणादायी गीताने करण्यात आली.

या प्रसंगी सर्व संघटनांच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सतीश तराळ म्हणाले की, जगातील अनेक देश धर्माधिष्ठित असले तरी भारत हा निधर्मी व बहुसांस्कृतिक देश आहे. येथे विविध धर्म, पंथ आणि संप्रदाय एकत्र नांदतात. त्यामुळे सर्वधर्म समभावाची भावना दृढ करण्यासाठी ईद मिलनसारख्या कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे.

इतर मान्यवरांनीही आपल्या भाषणातून सांगितले की, धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच असते. मानवता हाच कोणत्याही धर्माचा खरा आत्मा आहे. समाजात समता, बंधुता आणि परस्पर आदर वाढला तरच देशाची एकता मजबूत राहते. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत संवाद, सहकार्य आणि विश्वास वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमामुळे विविध समाजातील नागरिक एकत्र आले आणि भारतीय संविधानातील समता, बंधुता व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचा अनुभव देणारे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमात संविधान जागर प्रदर्शनी देखील लावण्यात आली होती. या प्रदर्शनीला उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय डवरे, संचालन प्रफुल्ल मंदा श्रीधर, आभार प्रदर्शन रवींद्र फुले, तर कविता सादरीकरण प्रीतम जौनपुरी व नीलिमा भोजने यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मो. अफसर भाई, श्रीधरराव डहाके, शंकरराव वसु, रामदासजी सदार, बाळासाहेब महल्ले, महेश देशमुख, शिरीन खान, पल्लवी ढोले, सुनीता रामटेके, नरेंद्र धर्माळे, सुभाष गौरखेडे, विजय डवरे, प्रफुल्ल मंदा श्रीधर, गणेश गहुकर, रवींद्र फुले, दिलीप लाडे, आशिष देशमुख, दिगंबर मेश्राम, संदीप यादव, पुंडलिक गोसावी, सचिन खोब्रागडे, सनी चव्हाण, प्रवीण वासनिक, शुभम दमाहे, मंजू वासनिक, वर्षा गावंडे, सरिता लाडे, विजया घोडेस्वार, हर्षा सगणे, विजया करोले, तन्वी, अनुजा भगत, साबीर अली, रेहमान शहा, दिलबर शहा, वसीम राज, वेदांत कोल्हे, सतीश पठाडे, पुरुषोत्तम दास बागडी, सतीश प्रेमलवार, अशोक वाटाणे, दिनेश वानखडे, अभिषेक खडके, नितीन गायकी, शुभम राठोड, वैभव घुगसे, जरीन खान, अॅड. सादिक, बशीर पटेल, अब्दुल रफिक, विनायक राव, अजहर अहमद, जितू खान, काझी इमरोद्दीन तसेच सर्व पदाधिकारी व साथी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन “या भारतात बंधुभाव नित्य वसू दे” असा संदेश देत भारतीय संविधानाच्या मूल्यांना अभिवादन केले. 

Post a Comment

Previous Post Next Post