प्रतिनिधी/निलेश निंबाळकर
अमरावती / वरूड : सामाजिक कार्यात व रक्तदानाच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेले व विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थेत कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते रक्तदाता संघ, वरुडचे संस्थापक तथा ऑरेंजसिटी थॅलेसेमिया निर्मुलन समितीचे उपाध्यक्ष जितेंद्र शेटीये यांना रक्तदानाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच सन २०१५ ते आता पर्यंत जास्तीत जास्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून जवळपास ३१००० रक्तदात्यांकडून रक्तदान करवून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्याकरीता रक्त पुरवठा केल्याबद्दल उत्तरप्रदेश मधील दुद्धी येथे प्रगती फाऊंडेशन ट्रस्ट, दुद्धी, सोनभद्र द्वारा नुकताच आयोजित वीर बिरसा मुंडा आंतराष्ट्रीय रक्तदाता सन्मान समारोह मध्ये वीर बिरसा मुंडा आंतराष्ट्रीय रक्तदाता पुरस्कार पद्मश्री लौंगी भुइया, दुद्धी नगर पालिका अध्यक्ष तथा माजी आमदार रुबी प्रसाद, माजी आमदार हरिराम शेरू, ओडीसा येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या निरीक्षक संज्युक्ता चॅटर्जी आचार्य यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगती फाऊंडेशन ट्रस्ट, दुद्धी अध्यक्ष विकासकुमार अग्रहरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी विजयकांत चौहान यांच्यासह रक्तदानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक देशातील सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. जितेंद्र शेटीये हे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडात्मक, रक्तदान, देहदान, नेत्रदान, अवयवदान, सामाजिक जनजागृती कार्यात अग्रेसर असून थॅलेसेमियाग्रस्त व्यक्तींना मदत करण्याचे कार्य सातत्याने करीत असतात. रक्ताची गरज असणाऱ्या व्यक्तींना वेळेवर रक्त उपलब्ध करून त्याना जीवनदान देण्याचे अमुल्य कार्य करीत आहे. वरुड नगरीत राक्त्दानांची चळवळ सुरु करून रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचे कार्यासोबत रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना रक्तदान करण्याकरीता प्रोत्साहित करून त्यांच्याकडून रक्तदान करून घेण्याचे कार्य करीत असून त्यांच्या या कार्यामुळे रक्तदानाची चळवळ अधिक बळकट होऊन अमरावती, नागपुर तसेच विविध जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे कार्य करीत आहे. जितेंद्र शेटीये यांना वीर बिरसा मुंडा आंतराष्ट्रीय रक्तदाता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे ऑरेंजसिटी थॅलेसेमिया निर्मुलन समिती, वरुड व रक्तदाता संघ, वरुडच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांसह विविध क्षेत्रातील संस्था, संघटना, नागरिक तसेच मित्र परिवार तर्फे त्यांचे अभिनंदन होत आहे.

