आडवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वामी समर्थ जनसेवा संस्था, आडवली तसेच अष्टगणकोट-श्री समर्थ गड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटदिन सोहळा शुक्रवार, दिनांक २० मार्च रोजी अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
पहाटे ब्रह्ममुहूर्तावर पारंपरिक विधीनुसार अभिषेक व पूजन सोहळ्याने कार्यक्रमांची सुरुवात झाली. पाणी, दूध, दही व पंचामृताद्वारे विधीवत अभिषेक करण्यात आला. यावेळी “शिव शंभो हर हर महादेव” तसेच स्वामी नामाचा अखंड जप सुरू होता.
श्री भाई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पूजन विधी पार पडले. उपस्थित भाविकांनाही अभिषेक करण्याचा योग लाभला. सकाळी आरतीनंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सेवेकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन व्यवस्था राखत भाविकांना सहकार्य केले. दिवसभर “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” व “ॐ श्री स्वामीनाथाय नमः” अशा नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
दुपारी आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पुरी, शिरा, जिलेबी, भाजी व वरण-भात अशा पंचपक्वान्नांचा प्रसाद भाविकांना देण्यात आला. संध्याकाळी आरतीनंतर रात्रीही महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
प्रचंड गर्दी असूनही सेवेकऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करत सर्व व्यवस्था सुरळीत पार पाडली. अखंड भजन, नामजप आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक उर्जेने भारावून गेला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या सोहळ्यास श्री समर्थ मठ, अष्टगणकोट व समर्थ गड, घाडीवाडी येथील सेवेकरी, सुमारे २५० महिला सेवेकरी, घाडीवाडी तरुण मित्र मंडळ, जेष्ठ नागरिक, भाविक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वस्त मंडळींमध्ये अरविंद जाधव, संजीव सावंत, सुनील सावंत, रविंद्र नानचे, श्रीधर परब, सुरज कदम आदींची उपस्थिती होती. मठात सुमारे २५० महिला व २५० पुरुष सेवेकरी सातत्याने सेवा देत असून भाविकांसाठी शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था करण्यात येते.
भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सोहळ्यात सहभाग नोंदवत हा प्रगटदिन सोहळा अविस्मरणीय ठरल्याची भावना व्यक्त केली.
