मा.सरपंच प्रशांत इंगळे यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी ; अन्यथा आंदोलनाचा इशारा
मूर्तिजापूर - तालुक्यातील रंभापुर गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या नागठाणा गावातील पाडण्यात आलेला प्रवासी निवारा तातडीने पुन्हा उभारण्यात यावा, अशी मागणी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत इंगळे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान नागठाणा येथील प्रवासी निवारा पाडण्यात आला होता. मात्र संबंधित विभागाने अद्याप नवीन निवारा उभारलेला नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः नागठाणा येथील विद्यार्थी रोज मूर्तिजापूर येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. निवाऱ्याअभावी त्यांना उन्हात व पावसात उभे राहावे लागत असून ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर, ज्या विभागाने राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण केले आहे, त्यांच्यामार्फत तात्काळ प्रवासी निवारा उभारण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.दरम्यान, संबंधित विभागाने लवकरात लवकर प्रवासी निवारा उभारला नाही, तर सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मा.सरपंच प्रशांत इंगळे यांनी दिला आहे.

