अमरावती : 19 मार्च हा दिवस महाराष्ट्राच्या शेतकरी समाजासाठी अत्यंत वेदनादायी आणि काळा दिवस मानला जातो. 19 मार्च 1986 रोजी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे साहेबराव करपे यांनी आपल्या पत्नी व मुलाबाळांसह पवणार आश्रम येथे सामूहिक आत्महत्या केली होती. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी समाज हळहळला होता.
तेव्हापासून किसान पुत्र आंदोलन च्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, गावागावांत 19 मार्च रोजी करपे परिवारास श्रद्धांजली अर्पण करून सहवेदना व्यक्त केली जाते.
अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ सकल शेतकरी समाजाने शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध नोंदवत शासनाच्या अपयशाची प्रतिकात्मक गुढी उभारून सामूहिक निषेध व्यक्त केला.
या अन्नत्याग आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास साडेतीनशे शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना तसेच स्व.साहेबराव करपे व त्यांच्या परिवारास सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कर्ज व नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने शेतकरी कार्यकर्ते प्रकाश साबळे यांनी नमन करून साडी-चोळी भेट देत सांत्वन करून रडकी-बोळवण केली .
या श्रद्धांजली व सहवेदना सभेच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष शरद दसरे होते. यावेळी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, आयोजक प्रकाश साबळे, हरिभाऊ मोहोड, डॉ. दिलीप काळे, जगदीश नाना बोंडे, गजानन अहमदाबादकर, विजय विल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या आयोजनात शेखर अवघड, नितीन पवित्रकार, महेश देशमुख, शरद जवंजाळ, अॅड. धनंजय तोटे, निलेश उबाड, समीर जवंजाळ, अशोकराव वाकोडे, अमोल भारसाकळे, राहुल तायडे, अक्षय साबळे, अमित कुचे, प्रवीण कोल्हे, गजानन भगत, सुनील पडोळे, अक्षय सरोदे, आकाश गडपाल, मिलिंद वंजारी, योगेश बोबडे आदी शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

