हिरपुर येथे अन्नदात्यासाठी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन ; शेतकरी प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

 

Farmer


कर्जमुक्ती, पिकांना रास्त भाव आणि विमा संरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषण ; राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता


Vidarbha Editor


मूर्तिजापूर - कृषीप्रधान देशात अन्नधान्य उत्पादन वाढत असतानाही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील हिरपुर येथे गुरुवार, १९ मार्च रोजी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस ‘शेतकरी कृतज्ञता दिवस’ म्हणून पाळण्यात आला.

सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत असून कर्जाचा वाढता बोजा त्यांना आर्थिकदृष्ट्या खचवित आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. उत्पादन वाढूनही उत्पन्न कमी होत असल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून आत्महत्यांसारख्या गंभीर घटना घडत असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव, शेतकरी कर्जबाजारी होणार नाही अशी शाश्वत व्यवस्था, वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी १०० टक्के अनुदानावर कुंपण योजना तसेच पिकांच्या नुकसानीवर दरवर्षी पिक विमा मिळण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली.

या उपोषणात जिल्हाध्यक्ष नितीन गावंडे, तालुका संघटक प्रविण चर्हाटे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम चिंचे, सदस्य प्रविण डांगे, संकेत दहिकर, अरुण धर्माळे, संदीप मेहरे तसेच जेष्ठ शेतकरी भास्करराव गडवे, विजयराव व गणपतराव गुल्हाने यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनानेही सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post