आयुष्यातले सांगाती ५१; दत्ताभाऊ मेघे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

 

Gavakadachibatmi


आयुष्यातले सांगाती ५१; दत्ताभाऊ मेघे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!


जगदीश का. काशिकर,

मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.


दत्ताभाऊ मेघे यांचा आणि माझा परिचय १९७८ मध्ये झाला. त्यावेळी ते महाराष्ट्राच्या वसंतदादा पाटील मंत्रिमंडळात नुकतेच राज्यमंत्री बनले होते. विशेष म्हणजे त्यावेळी ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. मात्र त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती.


त्यावेळी मी मुंबई दूरदर्शन चा वृत्त छायाचित्रकार म्हणून विदर्भात कार्यरत होतो. त्यावेळी नागपुरातून दत्ताभाऊ सोबत राजे तेचसिंगराव भोसले हे देखील मंत्री झाले होते. मंत्रीपदाची शपथ घेऊन हे सर्व मंत्री नागपुरात आल्यावर त्यांचे स्वागत आणि मग त्यांच्या पत्र परिषदा या दूरदर्शनसाठी कव्हर करायला जावे लागले, आणि तिथेच दत्ताभाऊंच्या पत्र परिषदेत त्यांचा माझा परिचय करून देण्यात आला. त्यावेळी मी देखील जेमतेमते २३ वर्षांचा होतो. मात्र माझ्यासारख्या नवख्या पत्रकार आणि छायाचित्रकार असलेल्या व्यक्तीला देखील दत्ताभाऊंनी जो काही मान दिला तो बघून मी काहीसा भारावून गेलो होतो. 


वसंतदादा पाटील यांचे हे मंत्रिमंडळ जेमतेम सहा सात महिने टिकले असावे. याच दरम्यान वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून दत्ताभाऊ विधान परिषदेत निवडून गेले आणि त्यांचे मंत्रिपद नियमित केले गेले होते. त्या निमित्ताने त्यांनी नागपूरच्या पत्रकारांना आपल्या बंगल्यावर स्नेहभोजनाला बोलावले होते. त्यावेळी देखील मी तिथे गेलो होतो असे आठवते.


दत्ताभाऊंची भेट झाली जरी १९७८ मध्ये झाली असली तरी त्यांचे नाव मी बरेच आधीपासून ऐकून होतो. १९७० नंतरच्या काळात त्यांनी युवक कॅडर नावाची एक तरुणांची संघटना उभी केली होती. त्या काळात दत्ताभाऊ एलआयसी एजंट होते. नंतर ते एलआयसीतच विकास अधिकारी देखील झाले होते. सरकारी व्यवस्था मध्ये जनसामान्यांना ज्या काही अडचणी यायच्या त्या सोडवण्यासाठी युवक कॅडर संघर्ष करत असे. त्यामुळे दत्ताभाऊ चे नाव वर्तमानपत्रातून मी नेहमी वाचत असे. 


१९७८ च्या जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात अकस्मात भूकंप झाला. वसंतदादा पाटील मंत्रिमंडळातील एक तरुण मंत्री शरद पवार यांनी पक्षाचा आणि आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षातील आणि मित्रपक्षातील अजून पाच आमदार होते‌. त्यातील एक दत्ता मेघे हे देखील होते. हळूहळू सत्ताधारी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडत गेली आणि आमदार बाहेर निघत गेले‌. शेवटी वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मग शरद पवारांनी तत्कालीन जनता पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये देखील दत्ताभाऊ मेघे हे राज्यमंत्री होतेच, आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती म्हणून त्यांचे वजनही खूप वाढले होते. 


त्या काळात शरद पवारांचे अनेक कार्यक्रम मी दूरदर्शनसाठी कव्हर केले. दरवेळी दत्ताभाऊ हमखास भेटायचेच‌ मग भेटले की "काय पाठक काय म्हणता?" म्हणून आवर्जून ते चौकशी करायचे. सप्टेंबर १९७८ मध्ये शरद पवार एक दिवसाच्या दौऱ्यावर नागपुरात आले होते. त्या दिवशी त्यांचा नागपूरच्या पटवर्धन ग्राउंड वर जाहीर नागरी सत्कार करण्यात आला होता. त्या दिवशी रात्री विमानतळावर मी गेलो होतो. तिथे दत्ताभाऊ देखील होतेच. त्यांनी लगेचच मला पकडून नेले आणि शरद पवारांशी माझा लगेचच परिचय करून दिला. एखाद्या मुख्यमंत्र्याशी समोर जाऊन हस्तांदोलन करणे आणि दोन मिनिट त्याच्याशी बोलणे हा माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव होता. तो त्या दिवशी दत्ताभाऊंमुळे मला मिळाला होता.


लगेचच दोन-तीन दिवसांनी नागपूर विद्यापीठात आंतर विद्यापीठ कबड्डी सामन्यांचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याचे प्रमुख अतिथी दत्ताभाऊच होते. त्यादिवशी देखील मी भेटल्यावर त्यांनी आवर्जून चौकशी केली. आता आमच्या वर्धेत सुद्धा कबड्डीच्या अखिल भारतीय स्पर्धा आहेत त्यावेळी दूरदर्शनसाठी कव्हर करायला तुम्ही या, असे आवर्जून निमंत्रणही त्यांनी दिले होते.


मंत्रीपदी येण्यापूर्वीच दत्ताभाऊंनी नागपुरात फार्मसी कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केले होते. १९८० मध्ये इंदिरा गांधींनी शरद पवार सरकार बरखास्त केले आणि महाराष्ट्रात फेरनिवडणुका निश्चित केल्या. त्यामुळे दत्ताभाऊंचे मंत्रीपद तर गेले, पण आमदारपद कायम होते. नागपूरचे एक ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक दिनकरराव देशपांडे हे दत्ताभाऊंचे बालमित्रच होते. त्यामुळे दत्ताभाऊ चे प्रसिद्धीचे काम दिनकरराव सांभाळून देत असत. मग दोन-तीनदा दिनकररावांसोबत मी दत्ताभाऊंच्या पांडे लेआउटच्या घरी आणि अत्रे लेआऊटच्या कॉलेजमध्येही गेलो होतो. याच दरम्यान दत्ताभाऊंनी हिंगण्याला इंजिनिअरिंग कॉलेज देखील सुरू केले होते. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाले होते. त्याचे दूरदर्शनसाठी चित्रीकरण करायला देखील मी गेलो होतो. दरवेळी भेटले की दत्ताभाऊ आवर्जून चौकशी करायचे. 


१९८४ मध्ये मी दूरदर्शन साठी कार्यक्रम निर्मिती करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या योजनेतून एक प्रकल्प हाती घेतला होता. त्याला बँकेचे कर्ज तर मंजूर झाले पण बाकी पैशाची जुळवाजुळव आणि महाराष्ट्र शासनाकडून काही तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी अशा समस्या माझ्यासमोर होत्या. त्यावेळी दिनकरराव मला दत्ताभाऊकडे घेऊन गेले होते. त्यांनी त्या प्रकरणात मला पूर्ण सहकार्याचा हात पुढे केला होता. 


दुर्दैवाने हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला नाही. त्यासाठी मला दीर्घकाळ( दहा वर्ष) संघर्ष देखील करावा लागला. त्या दरम्यान मी अनेकदा दत्ताभाऊंना जाऊन भेटत असे. दरवेळी आवश्यक ती मदत आणि मार्गदर्शन ते करायचेच.


१९८८ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर होऊन शरद पवारांचे सरकार सत्तेत आले. त्यावेळी दत्ताभाऊंना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली होती. त्या काळात दत्ताभाऊंकडे पर्यटन हे खाते आले होते. माझ्या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटन खात्यासाठी काही माहितीपट तयार करावे असा प्रस्ताव घेऊन मी दत्ताभाऊकडे गेलो होतो. त्याला दत्ताभाऊंनी लगेच पाठिंबा देत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देखील दिल्या होत्या. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे तो प्रकल्प उभा न झाल्यामुळे हे सगळे बेत बारगळले. 


१९९१ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या. त्यावेळी दत्ताभाऊंना नागपुरातून लोकसभेचे उमेदवार म्हणून उमेदवारी दिली होती त्यांच्या विरोधात आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजप मध्ये आलेले बनवारीलालजी पुरोहित हे उमेदवार होते. त्या निवडणुकीत विरोधकांकडून दत्ताभाऊंवर त्यांचे व्यक्तिगत आयुष्य पुढे करत पातळी सोडून टीका करणाऱ्या घोषणा दिल्या जात होत्या. त्या काळात एक पत्रकार या नात्याने दत्ताभाऊंची माझी भेट होत असे. त्या टिकेने दत्ताभाऊ चांगलेच अस्वस्थ झाले होते. मात्र त्यांनी कोणताही प्रतिवाद न करता शांतपणे आपला प्रचार सुरू ठेवला. परिणामस्वरूप ते दणदणीत मताधिक्याने विजयी झाले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी मला दिल्लीत येण्याचे आमंत्रणही दिले होते. 


दूरदर्शनसाठी कार्यक्रम निर्मिती करण्याचा माझा प्रकल्प बारगळण्याची चिन्ह होती. तरी १९९४ पर्यंत त्यासाठी मी प्रदीर्घ पाठपुरावा केला होता. त्या काळात मी सातत्याने दिल्लीत जात असे. एकदा दिनकरराव देशपांडे यांनी सुचवले की तुझ्या दूरदर्शनच्या संबंधातून दत्ताभाऊंना राष्ट्रीय प्रसारणात संधी कशी मिळेल ते जरा मॅनेज कर. त्यानुसार एका दिल्ली भेटीत त्या काळातील दूरदर्शनचे उपमहाविदेशक वृत्त डॉ. गोविंद गुंठे यांची आणि दत्ताभाऊंची मी गाठ घालून दिली होती. त्यानंतर दत्ताभाऊंचे काही कार्यक्रम राष्ट्रीय प्रसारणात झाले देखील होते. 


दरवेळी दिल्लीला गेलो की मी एखाद्या हॉटेलमध्ये उतरत असे. दत्ताभाऊंना कळले की ते त्यांच्या बंगल्याच्या गेस्ट रूम मध्येच का उतरत नाही म्हणून आग्रह धरायचे. माझ्या प्रकल्पाच्या संबंधात दिल्लीत त्यांनी संबंधित मंत्रालयाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझ्यासाठी फोन देखील केले होते. 


१९९५ नंतर मी मुद्रित माध्यमात पत्रकारिता करतानाच सोबत माझे एक राजकीय मित्र आ. चैनसुख संचेती यांची प्रसिद्धी आणि विधानसभेचे कामकाज हे देखील सांभाळून देत होतो. संचेती परिवार आणि दत्ताभाऊंचे खूप घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे मग दत्ताभाऊंच्या नियमित भेटीगाठी होऊ लागल्या. त्या काळात माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला काही कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या होत्या. संबंधित व्यक्तीने ग्रंथालय शास्त्रात पदवी घेतली होती. हा विषय मी दत्ताभाऊ शी बोलल्यावर त्यांनी लगेच संबंधित व्यक्तीला त्यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून नोकरीला लावून घेतले. तसेच तिथेच होस्टेलवर राहण्याची सोय देखील करून दिली होती. 


१९९९मध्ये महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले. त्यावेळी महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये दत्ताभाऊ पुन्हा एकदा मंत्री झाले. त्या काळात मी नागपूर आणि मुंबई अधिवेशनात विधान परिषद कव्हर करण्यासाठी नियमित जात असे. मग अधिवेशन काळात दत्ताभाऊंच्याच चेंबर मध्ये बसून बातम्या लिहायचो. अनेकदा दुपारचे जेवण त्यांच्याकडे व्हायचे. खूपदा ते बंगल्यावर देखील बोलावून घ्यायचे. 


२००२ मध्ये मी रामटेकच्या गडावरून या नावाने एक नियतकालिक सुरू केले. पहिल्याच अंकासाठी मी दत्ताभाऊंना भेटायला गेलो. त्यांना त्या अंकासाठी मी शुभेच्छा संदेश मागितला होता. मात्र लगेचच त्यांनी आपला पी ए बाळू भोयर यांना बोलावून पाठकांना आपल्या कॉलेजची एक ५००० रुपयांची जाहिरात दे आणि लगेच कॅश पैसे देऊन टाक, अशा सूचना दिल्या‌. पहिल्याच झटक्यात त्यांच्याकडून मिळालेले हे उत्तेजन बघून माझाही उत्साह एकदमच वाढला.


त्यानंतर जेव्हा जेव्हा मी दत्ताभाऊंकडे जाहिरात मागायला गेलो, तेव्हा त्यांनी कधीच नाराज केले नाही. तुमच्यासारख्यांच्या प्रकल्पांना मदत करणे हे माझे कामच आहे, असे ते कायम सांगायचे. एकदा एका विशेषांकाच्या आतल्या कव्हर पेजवर जाहिरात नव्हती. ऐनवेळी काय करायचे म्हणून मी दत्ताभाऊंच्याच कॉलेजची जुनी जाहिरात टाकून दिली. अंक प्रकाशित झाल्यावर मी दत्ताभाऊ कडे तो अंक घेऊन गेलो आणि तुमच्या परवानगी शिवाय ही जाहिरात टाकली, असे त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले काही हरकत नाही पाठक, तुम्ही जाहिरात टाकलीत ना, मग याचे पैसे किती द्यायचे मी? त्यांना पैशाचा काही प्रश्न नाही असे म्हणताच त्यांनी लगेच बाळू भोयर ला बोलावले आणि पाठकांना दहा हजार रुपये देऊन टाक असे सुचवले. त्यांचे हे दातृत्व होऊन माझा त्यांच्याबद्दलचा आधार बराच दुणावला होता.


२००५ मध्ये मी रामटेकच्या गडावरून चा कृषी विषयक विशेषांक प्रकाशित करण्यासाठी ठरवले होते. त्यावेळी शरद पवार कृषी मंत्री होते. दत्ताभाऊंचे आणि शरद पवाराचे खूप जवळचे संबंध असल्यामुळे शरद पवारांची मुलाखत मिळावी म्हणून मी दिल्लीत दत्ताभाऊंकडे जाऊन पोहोचलो. ते स्वतः मला पवारांकडे घेऊन गेले होते. त्यांनी माझ्यासाठी खूप पाठपुरावा देखील केला. त्यासाठी दोन-तीनदा दिल्लीत चक्रा देखील झाल्या. मात्र पवारांची मुलाखत मिळू शकली नाही. तरीही दत्ताभाऊंचे सहकार्य कायम मोलाचेच राहिले होते. त्या काळात नागपुरात कुठेही भेटले तर ते आवर्जून पवारांशी काय बोलणे झाले आणि त्यांचे काय म्हणणे आहे याची मला स्वतःहून माहिती देत असत. 


दिल्लीच्या एका भेटीत त्यांच्या घरी रात्री त्यांनी जेवायला बोलावले होते. त्या दिवशी बराच वेळ आमच्या गप्पा झाल्या. त्यात त्यांनी त्यांच्या लहानपणी आणि तरुण वयात करावा लागला संघर्ष आणि बघावी लागलेली गरीबी याच्या अनेक आठवणी सांगितल्या होत्या. त्यामुळेच आपण कुणाही गरजू व्यक्तीला मदत करायला कधीच नाही म्हणत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले होते. 


त्यांच्या दातृत्वाचे अनुभव फक्त मलाच आले असे नाही, तर माझ्यासारख्या अनेक पत्रकार मित्रांना त्याचे अनुभव आले होते. इतकेच काय पण त्यांच्याकडे कोणीही मदत मागायला गेला तर त्याला त्यांनी कधीच रिक्त हस्ताने परत पाठवले नाही. एकदा मुंबईला त्यांच्या फ्लॅटवर त्यांच्याशी बोलत बसलो असताना कुणीतरी कार्यकर्त्याचा फोन आला, आणि त्याचे कोणीतरी नातेवाईक तिथे जे जे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत असे त्याने सांगितले. लगेच दत्ताभाऊ जे जे मध्ये फोन केले आणि तिथल्या वरिष्ठ डॉक्टरांना या पेशंटला व्यवस्थित उपचार द्या आणि काळजी घ्या अशा सूचना दिल्या. लगेचच आपल्या पी ए ला बोलावून संबंधिताकडे २५ हजार रुपये तातडीने पाठवून द्यायला त्यांनी सांगितले होते. 


२००९ मध्ये माझ्या नव्या घराचा वास्तुपूजन समारंभ होता. त्याचे निमंत्रण द्यायला मी दत्ताभाऊ कडे गेलो. योगायोगाने त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते. तेव्हा दत्ताभाऊ राज्यसभा सदस्य होते. त्यामुळे त्यांना दिल्लीत राहणे भाग होते. मात्र वास्तुपूजनाच्या दिवशी त्यांनी आपला नागपूरातील एक सहाय्यक पाठवून पुष्पगुच्छ भेटवस्तू आणि काही रोख रक्कम अहेर म्हणून आवर्जून पाठवले होते. नंतर सवडीने नवीन घर बघायला येतो असाही निरोप त्यांनी दिला होता मात्र त्यांचे येणे काही झाले नाही. 


२०१० पासून मी रोटरी चळवळीत सक्रिय झालो होतो. २०१२ मध्ये मी रोटरीचा सेक्रेटरी झालो. त्यावर्षी मी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. दरवेळी दत्ताभाऊकडे गेलो की प्रत्येक उपक्रमाला ते आवर्जून मदत करायचे. नंतर मी रोटरी क्लबचा अध्यक्ष झालो. तेव्हा देखील दरवेळी त्यांची मदत मिळत होती. २०१६-१७ मध्ये वर्धेचेच महेश मोकळकर हे रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झाले. त्यांच्या पदग्रहण समारंभाला दत्ताभाऊ स्वतः विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यादिवशी दत्ताभाऊ मेघे यांनी तुम्ही रोटरी तर्फे कोणताही लोककल्याणाचा मोठा प्रकल्प हाती घ्या, मी तुम्हाला पाच कोटी रुपये पर्यंत मदत करायला तयार आहे, असे जाहीर केले त्यानुसार मोकळकरांनी मोठ्या प्रकल्पाचे नियोजन केले. त्यावेळी दत्ताभाऊ पूर्णतः मदतीचा हात पुढे केला होता. 


२०१२ मध्ये मी हिंदुस्थान समाचार तर्फे देशाच्या विकासात छोट्या राज्यांचे योगदान या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित केले होते. दिवसभराचे राष्ट्रीय चर्चासत्र म्हणजे खर्च बराच येणार होता. त्यावेळी मी काही सहकाऱ्यांसोबत दत्ताभाऊंना भेटायला गेलो. लगेचच त्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि आमचा तो कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी पूर्णतः मदत देऊ केली होती. 


दत्ताभाऊ वर्ध्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षीचा गणेशोत्सव हा मोठ्या धडाक्यात पार पडत असे. तिथे दरवर्षी एखादा मोठा कार्यक्रम आयोजित करून त्यासाठी नागपूरच्या सर्व पत्रकार मित्रांना ते वर्धेला घेऊन जात असत. तिथे कार्यक्रमांसोबत पत्रकारांना ते शाही मेजवानी देखील द्यायचे. त्यांच्याकडली कोणतीही मेजवानी ही पत्रकारांसाठी एक पर्वणी असायची. त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या या कार्यक्रमांना मी देखील अनेकदा उपस्थिती लावलेली आहे, आणि त्यांच्या आतिथ्याचा अनुभव घेतला आहे.


दत्ताभाऊ मूळचे काँग्रेसचे, त्यातही ते शरद पवारांचे जवळचे होते. त्यामुळे ते पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. मात्र कालांतराने स्थानिक राजकारणामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या बंगल्यावरच त्यांनी पत्र परिषद घेतली होती. त्या पत्र परिषदेत आपण पवारांचा साथ सोडत असल्याबद्दल त्यांनी घोषणा केली. त्यावेळी त्यांचा कंठ अक्षरशः दाटून आला होता. त्यांना हुंदका आवरला नव्हता. 


राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काही काळ ते काँग्रेसमध्ये परतले होते. मात्र तिथेही ते रमले नाही. सर्व पक्षात त्यांची मैत्री होती. विशेषतः नितीन गडकरी यांचे त्यांचे फारच सख्ख्य होते. मग त्यांनी गडकरींच्याच सूचनेवरून भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. 


मला आठवते २०१४ मध्ये देशात पहिल्यांदा पूर्ण बहुमत मिळवून भाजपचे सरकार सत्तेत आले होते. त्यावेळी २६ मे ला पंतप्रधान मोदींचा शपथविधी झाला. त्याच मंत्रिमंडळात नितीन गडकरी देखील मंत्री झाले होते. २७ मे रोजी गडकरींचा वाढदिवस होता. रात्री उशिरा गडकरी विमानाने नागपुरात आले. त्यांच्या वाड्यावर प्रचंड गर्दी जमली होती. त्याचवेळी वाड्याच्या आतल्या ड्रॉइंग रूम मध्ये मी डोकावलो, तर तिथे दत्ताभाऊ बसलेले दिसले. त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही सुपुत्र सागर आणि समीर हे दोघेही होते. सागर वर्धेतून काँग्रेसचा उमेदवार म्हणून निवडणूक लढला होता आणि पराभूतही झाला होता. मी सहजच चौकशी केली तर दत्ताभाऊ हळूच मला म्हणाले "पाठक बातमी कुठे लिक करू नका, पण आठवडाभरात मी दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करतो आहे." मी त्यावेळी त्यांचे अभिनंदन देखील केले. दुसऱ्याच दिवशी मी मेघे परिवार भाजपवासे होणार अशी बातमी देखील चालवली होती. लगेचच दोन दिवसात दत्ताभाऊंनी नितीनजींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला होता. 


पत्रकारितेसोबत सामाजिक क्षेत्रात देखील माझ्या उलाढाली चालू असायच्या. मग अनेकदा कोणीतरी समस्या घेऊन यायचे. त्यात अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असायचा. दत्ताभाऊंच्या कॉलेजमध्ये जेव्हा जेव्हा मी अशा गरीब विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन गेलो, तेव्हा दत्ताभाऊंनी अशा विद्यार्थ्यांना फी माफ करून टाकली होती. माझ्या आठवणीत शेवटला मी त्यांच्याकडे २०१९ मध्ये गेलो होतो. त्यावेळी आमच्याच एका मित्राकडे काम करणाऱ्या स्वयंपाकीण बाईंचा मुलगा मॅट्रिकला चांगले गुण मिळवूनही इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेऊ शकणार नव्हता. ही समस्या घेऊन मी गेलो होतो. दत्ताभाऊंनी लगेचच त्याची पाचही वर्षाची शिक्षणाची सोय करून दिली होती. 


नंतर कोरोनाच आला. एव्हाना दत्ताभाऊ देखील थकत चालले होते. त्यामुळे भेटीगाठी कमी झाल्या होत्या. तरीही संपर्क होताच. गतवर्षी २०२४ मध्ये मी बराच आजारी झालो होतो. दत्ताभाऊंनाही कळले, तेव्हा त्यांनी माझ्या घरी कुटुंबीयांना फोन केला, आणि माझी चौकशी केली. काहीही मदत लागली तर कळवा, मी भेटायला येतो, असेही त्यांनी कळवले होते. आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेण्याचा त्यांचा स्वभाव इथेही दिसून आला होता. 


दरवर्षी दत्ताभाऊंच्या वाढदिवसाला त्यांना भेटून त्यांचे अभिष्टचिंतन करण्याचा पहिल्यांदा मी कायम ठेवला होता. मात्र गतवर्षी मी जाऊ शकलो नव्हतो. यंदा मात्र ११ नोव्हेंबर २०२५ ला मी आवर्जून त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो. नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे भेटणा-यांची प्रचंड मोठी रिघ लागली होती. भेट झाली तेव्हा दत्ताभाऊंनी आवर्जून माझी चौकशी केली. प्रकृतीबाबत देखील विचारले. त्यावेळी दत्ताभाऊ खूपच थकलेले जाणवत होते. वयाची ८९ वर्ष त्यादिवशी पूर्ण झाली होती. तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील तेज मात्र कायम दिसत होते. 


आणि मग २२ फेब्रुवारी च्या मार्चच्या रात्री अचानक टीव्हीवर बातमी ऐकली, दत्ता मेघे यांच्या निधनाची. मला कळतच धक्का बसला. लगेचच मी त्यांचे चिरंजीव समीर मेघे यांना फोन केला. समीरने बातमी खरी असल्याचे सांगितले. 


दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि माझे पत्रकार मित्र विनोद देशमुख दत्ताभाऊच्या पांडे लेआउट मधील बंगल्यावर पोहोचलो. त्यावेळी तिथे प्रचंड गर्दी जमली होती. त्याच गर्दीत आम्हीदेखील रांगेत उभे राहिलो. तिथे जमलेला प्रत्येक जण दत्ताभाऊच्या दातृत्वाची दिलदारीची माणुसकीची तारीफ करत होता आणि आपल्या आठवणी जाग्या करत होता. 

दत्ताभाऊ एक राजकारणी कमी आणि समाजसेवी जास्त असे व्यक्तिमत्व होते. ते उत्तम प्रशासक होते. मात्र प्रशासन करताना त्यांनी लोकहीत हा दृष्टिकोन कायम ठेवला होता. त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थांचा प्रचंड मोठा विस्तार केला. त्याचबरोबर सहकारी तत्त्वावर कारखाने देखील सुरू केले. मात्र हे करताना गोरगरिबांचे कल्याण हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले. त्यामुळेच ते जगन्मित्र बनले होते. त्यांच्या अनेक मित्रांपैकी मी देखील एक होतो याचा मला निश्चितच अभिमान आहे. आज दत्ताभाऊ जाऊन दहा दिवस झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आठवणींना मी उजाळा देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post