शाखा बांधणी, ईद मिलन सोहळा व चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन
अमरावती, दि. १४ मार्च २०२६ :
गुरुदेव सेवाश्रम, राधानगर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अनिस) अमरावती जिल्हा व शहर शाखेची पाक्षिक बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. मो. अफसर भाई (जिल्हा कार्यवाह, बुवाबाजी विरोधी संघर्ष विभाग) होते. प्रमुख मार्गदर्शन मा. डॉ. सतीश तराळ (उपाध्यक्ष, महा. अनिस अमरावती) यांनी केले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून मा. विजय डवरे (जिल्हा प्रधान सचिव), मा. प्रफुल्ल मंदा श्रीधर (जिल्हा कार्याध्यक्ष) व मा. नरेंद्र धर्माळे (जिल्हा कार्यवाह, वैज्ञानिक जाणीवा विभाग) उपस्थित होते.
बैठकीत मागील बैठकीचा अहवाल सादर करण्यात आला तसेच आगामी कार्यक्रमांची रूपरेषा मांडण्यात आली. शाखा बांधणी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १० शाखा पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. पुढील काळात शाखा विस्तारासाठी विशेष दौरा आयोजित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
तसेच विविध जनजागृती उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. येत्या २२ मार्च २०२६ रोजी गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, महा. अनिस अमरावती व संविधान जागर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ईद मिलन सोहळा’ आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.
यावर्षी चवदार तळे सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचेही नियोजन करण्यात आले.
पुढील बैठक शनिवार, दि. ४ एप्रिल २०२६ रोजी गुरुदेव सेवाश्रम, राधानगर येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीस रवींद्र फुले, दिलीप लाडे, वर्षा गावंडे, मंजू वासनिक, लक्ष्मण तडस, नरेंद्र धर्माळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन दिलीप लाडे व आभार वर्षा गावंडे यांनी केले. विशेष म्हणजे बैठकीसाठी विशेष सहकार्य आशिष देशमुख सर्वांना निमंत्रीत करणे, समन्वय करणे हे कार्य करून केले.
प्रारंभी गीत सादर करण्यात आले तर शेवटी “विवेकाचा आवाज बुलंद करूया – जय संविधान” या घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
