इनामी जमिनीत गहू पेरल्याने मज्जाव करण्यास गेलेल्या महिला तलाठी ना मारहाण गुन्हा दाखल
माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी येथील शेतात घडली घटना
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार महसूल मंडळातील मच्छिंद्र पार्डी येथील देवस्थानाच्या शासन ताब्यातील जमिनीतून गहू काढणी करत असताना पाहणीस गेलेल्या दोन महिला तलाठी कर्मचाऱ्यांना शेतात नायलॉन दोरीने बांधून हल्ला करून जबर मारहाण झाल्याची घटना दि १३ रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली असून 4 आरोपी विरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तहसीलदारांच्या आदेशाने सदर पथक सायंकाळी अंदाजे ६.४० वाजता शेतात पोहोचले असता तेथे गहू काढणी सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी उपस्थित असलेल्या अश्विनी भिमराव मुनेश्वर,भिमराव मुनेश्वर, निलश्री भिमराव मुनेश्वर व धनराज भिमराव मुनेश्वर यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली. तसेच नायलॉनच्या दोरीने त्यांना वेढा घालून बांधून टाकून अटकाव करत थापड-बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.संशयित आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी चक्क महिला कर्मचारी यांचा मोबाईल काढून घेतले या प्रकरणी चार जणांविरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर तालुक्यातील मच्छींद्र पार्डी येथील शेत सर्वे क्रमांक २ ही मारोती देवस्थान ईनाम नावावर असलेली जमीन शासन ताब्यात आहे. या जमिनीत काही व्यक्तींनी लिलाव प्रक्रिया न करता गहू पेरणी केल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार तहसीलदारांच्या आदेशानुसार तलाठी सज्जा मच्छींद्र पार्डी च्या व लगतच्या सज्जातील एक अशा दोन महिला तलाठी घटनास्थळावर पाहणीसाठी गेल्या होत्या. यावेळी सर्वांना पाहून आरोपींनी कोयते दाखवून त्यांना बांधत मारहाण केली त्यामुळे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी घटनास्थळ गाठून कर्मचाऱ्यांना सोडवत सिंदखेड पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक रमेश जाधवर, यांचे सह पोलीस पुढील तपास करत आहे

