जिल्ह्यात अव्वलस्थानी : कृषी विभागाच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मूर्तिजापूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ अॅपला मूर्तिजापूर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. दिनांक १३ मार्च रोजी तालुक्यातील ‘महाविस्तार’ अॅप डाउनलोडची संख्या १२ हजारांचा टप्पा पार करत अकोला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तसेच आत्मा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण जनजागृती आणि प्रयत्नांमुळे ही कामगिरी शक्य झाली. शेतकऱ्यांना अॅपची माहिती देणे, प्रत्यक्ष शेतभेटी घेऊन अॅप डाउनलोड करून देणे आणि त्यातील सुविधांची माहिती करून देणे यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबविली होती.
या मोहिमेला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे अल्पावधीतच १२ हजार शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार’ अॅप डाउनलोड केले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, हवामान माहिती, शासकीय योजना तसेच विविध कृषी सल्ला मोबाईलवर उपलब्ध होत आहे.
कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे डिजिटल माध्यमातून शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होत असून, पुढील काळात अधिकाधिक शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार’ अॅपचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


