ग्रामसेवक कॉलनी–रविदास नगर परिसरातील घटना ; गव्हाच्या पिकालाही धोका
नगर परिषदेच्या अग्निशमन व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मूर्तिजापूर - शहरातील ग्रामसेवक कॉलनी आणि रविदास नगर परिसरातील मोकळ्या जागेत साचलेल्या वाळलेल्या गवताला अचानक आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक कॉलनी आणि रविदास नगर परिसरातील खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत साचलेले होते. दुपारच्या सुमारास अचानक या गवताला आग लागली. उन्हाची तीव्रता आणि कोरडे गवत यामुळे आगीने काही वेळातच मोठा आकार घेतला.
दरम्यान, या आगीचा भडका वाढत जाऊन लगतच्या शेतातील कापणीस तयार असलेल्या गव्हाच्या पिकालाही धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी व परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. मात्र घटनास्थळाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाची मोठी गाडी तेथे पोहोचू शकली नाही. परिणामी पोलिस कर्मचारी, पत्रकार आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत बादल्यांमधून पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.या घटनेनंतर नगर परिषदेच्या अग्निशमन व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मूर्तिजापूर नगर परिषदेकडे लहान अग्निशमन वाहन तसेच अग्निशमन दलाच्या दोन मोटारसायकली उपलब्ध असतानाही त्या घटनास्थळी का पोहोचल्या नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याशिवाय नगर परिषदेत अग्निशमन विभागात सेफ्टी ऑफिसरचे पदही सध्या रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे योग्य नियोजनाच्या अभावामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आगीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असताना, मूर्तिजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाची ही बेफिकीर कार्यपद्धती नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. आता या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags - #वाळलेगवत, #आग, #अग्निशमन, #भीषणआग, #नागरिकसहकार्य, #गुणवत्ता, #सुरक्षा, #पर्यावरण, #ग्रामपंचायत, #नागरिक, #परिस्थिती, #फायरसेफ्टी, #वातावरणसुरक्षितता, #अग्नितांडव, #सामाजिकजागृती


