गावाकडची बातमी | कालव्याच्या पाण्यामुळे गव्हाचे मोठे नुकसान; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षाचा आरोप

 

धामणगाव रेल्वे





जिल्हा प्रतिनिधी / निलेश रामगावकर 

धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजे तळेगाव दशासर येथील सर्वे नं. ७८१/१ भाग क्रमांक ३ मधील शेतकरी रूपेश राजेंद्र जयसिंगपुरे यांच्या गव्हाच्या पिकाचे कालव्याच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कालव्यातील पाणी ओव्हरफ्लो होऊन थेट शेतात शिरले. त्यामुळे संपूर्ण शेतीला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उभ्या गव्हाच्या पिकात पाणी साचल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

याबाबत शेतकरी रूपेश जयसिंगपुरे यांनी सांगितले की, कालवा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता लक्षात घेऊन यापूर्वीच पाटबंधारे विभाग, धामणगाव रेल्वे येथील अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

सदर घटनेनंतरही विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

पीडित शेतकऱ्याने तातडीने पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post