ग्रामपंचायत सावळी दातुरा पं स अचलपूर येथील प्रकरण!
अचलपूर – अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत सदस्य राजू उर्फ मो आसीम मो नसीम यांना अपात्र ठरविण्याचा महत्त्वपूर्ण आदेश उपजिल्हाधिकारी अमरावती यांनी दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत संबंधित सदस्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर सुनावणी करून हा निर्णय घेण्यात आला.
प्रकरणातील निष्कर्षानुसार, संबंधित सदस्याने परतवाडा अंजनगाव रोडवर महाराष्ट्र महामार्ग प्राधिकरण च्या जागेत अनधिकृतरित्या अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. यासंदर्भात महाराष्ट्र महामार्ग प्राधिकरणाच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे आढळून आले. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ पोटकलम (१)(ज -३)(१) ग नुसार सदस्य पदासाठी अपात्र ठरविण्यात आले.
यासोबतच, अर्जदार प्यारेलाल काशिनाथ प्रजापती यांनी दाखल केलेला विवाद अर्ज मंजूर करण्यात आला असून, संबंधित सदस्याला ग्रामपंचायत सावळी दातुरा येथील सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्यात आले आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार अचलपूर यांना निर्देश देण्यात आले आहेत
या निर्णयामुळे ग्रामपंचायत पातळीवर नियमबाह्य कामकाजावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
