गावाकडची बातमी | गोकुंदा रस्ता प्रश्न पेटला; प्रशासनाला 15 दिवसांची शेवटची संधी!

 




विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

किनवट : किनवट ते नांदेड राष्ट्रीय महामार्ग 161A चे काम सुरू होऊन जवळपास दहा वर्षे उलटली असली, तरी गोकुंदा गावातून जाणारा रस्ता आजही अपूर्ण अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या महामार्गावरील बहुतांश भागाचे काम पूर्ण झाले असले, तरी गोकुंदा येथील रस्ता रेल्वे उड्डाण पुलाच्या कारणावरून गेल्या अनेक वर्षांपासून रखडवून ठेवण्यात आला आहे. तसेच या रस्त्याची नियमित देखभाल व दुरुस्तीही करण्यात आलेली नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

सध्या या मार्गावर मोठमोठे खड्डे, उडणारी धूळ आणि वाहतुकीची वाढती समस्या यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना दुचाकीने व पायी चालणे कठीण झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असून व्यापारी व दुकानदार विशेषतः त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, या समस्येच्या निराकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे व प्रशांत काळे यांनी पुढाकार घेत स्वाक्षरी मोहीम राबवली. धुळीमुळे व खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आणि निवेदन तयार केले.

 दिनांक 16 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता हे निवेदन उपविभागीय अधिकारी किनवट झेनित चंद्रा (भा.प्र.से.) यांना सादर करण्यात आले. यावेळी संबंधित समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.

यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत, ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला पंधरा दिवसांचा अवधी द्यावा, अशी विनंती केली. तसेच शक्य तितक्या लवकर ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी प्रा. विजय खूपसे, मुक्तीराम घुगे, दिलीप मुनेश्वर, उल्हास जाधव, प्रा. आनंद भालेराव,  प्रा. दगडू भरकड, सुशील कदम पाटील, रमेश आंधळे, शिवाजी बरबडकर, प्रवीण शेख, सुजाता भरणे, अतुल दर्शनवाड, जयवंत बोंबले, जितेंद्र कुलसंगे, नौशाद खान, उदयसिंह राठोड, संदेश भवरे, रमेश आंधळे, उत्तमराव वानखेडे, शेख रशीद, दीपक शिंदे पाटील, ओमेश्वर राठोड, मोईन (पत्रकार), गोविंद श्रीमनवार, प्रमोद जाधव, संतोष वाघमारे, प्रशांत हिरे, गंगाधर कदम यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

मात्र, प्रशासनाने दिलेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post