अंदाजे दीड लाखांचे नुकसान ; तळेगाव पोलिसात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल
धामणगाव रेल्वे : सुरज वानखडे
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील कामनापूर घुसडी येथील ४ एकर शेतातील चन्याच्या गंजीला आग लावून जाणीवपूर्वक शेतकऱ्याचे मोठे नुकसान केल्याची घटना मंगळवारी ता. ३ मार्च पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी शेतकरी संजय विठ्ठल वैद्य वय ५१, व्यवसाय शेती, रा. धामणगाव रेल्वे यांनी तळेगाव दशासर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, संजय वैद्य यांचे कामनापूर घुसडी येथे त्यांचे ६ एकर शेत आहे त्यामधून चार एकर क्षेत्रात चणा पेरलेला असून होता दरम्यान चण्याची कापणी करून गंजी लावण्यात आली होती. मात्र मंगळवारी (ता. ३ मार्च) सकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास चणा तयार करण्यासाठी ते शेतात गेले असता, चण्याची गंजी पेटलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याच वेळी गावातील सुरज अशोक माळोदे (वय ३१) हा शेतातून पळून जाताना दिसल्याचे वैद्य यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
जुन्या वादातून आरोपी याने आपले मोठे नुकसान केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या आगीत शेतातील सुमारे ५० क्विंटल चणा जळून खाक झाला असून अंदाजे १ लाख ५० हजारं इतके नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
