युडीआयडी कार्ड नसल्यास दिव्यांगांचे अनुदान धोक्यात ; २५ मार्चपूर्वी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन...!

 

जामनीक


तहसीलदार शिल्पा बोबडे यांचे निर्देश ; आधार संलग्न युडीआयडी कार्ड अनिवार्य


विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

मुर्तिजापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आधार कार्ड संलग्न करून आवश्यक कागदपत्रे २५ मार्च २०२६ पूर्वी ग्राम महसूल अधिकारी किंवा महसूल सेवकाकडे जमा करावीत, असे आवाहन तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे यांनी केले आहे.

        सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड संबंधित योजनेशी तीन महिन्यांच्या आत संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच १५ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अर्थसहाय्य १,५०० रुपयांवरून वाढवून २,५०० रुपये करण्यात आले आहे.

हे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते. दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना, सवलती व शासकीय लाभ मिळवण्यासाठी यूडीआयडी कार्ड अनिवार्य करण्यात आले असल्याने मुर्तिजापूर तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले यूडीआयडी कार्ड व आधार कार्ड अद्ययावत करून निर्धारित मुदतीपूर्वी जमा करावे, असेही तहसीलदार बोबडे यांनी स्पष्ट केले.निर्धारित मुदतीत यूडीआयडी कार्ड व आधार कार्ड जमा न केल्यास पात्र लाभार्थ्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post