भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या बलिदान स्मृतीला अभिवादन; राष्ट्रप्रेमाची ज्योत चेतविणारा उपक्रम
विदर्भ संपादक/ मिलिंद जामनिक
मुर्तीजापुर : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अमर क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदान स्मृतीदिनानिमित्त “शहीदांना वंदन, सामूहिक उपवास कार्यक्रम व समर्पण पुरस्कार वितरण सोहळा” मुर्तीजापुरात आयोजित करण्यात आला आहे. त्याग, समर्पण आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचा जागर कार्यक्रमातून केला जाणार आहे.हा प्रेरणादायी उपक्रम भूमिपुत्र फाउंडेशन सभागृह, संत वासुदेव महाराज भूमिपुत्र अभियान, सिरसो फाटा, दर्यापूर रोड येथे पार पडणार असून, गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.सोमवार, दि. २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता गुरुदेव सेवा मंडळ, मुर्तीजापूर तालुका यांच्या वतीने क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात येणार आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या वीरांच्या स्मृती जागवून नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बबनराव देशमुख, समाजहितैषी उत्तमराव पिंजरकर तसेच भूमिपुत्र फाउंडेशनच्या मार्गदर्शक श्रीमती निर्मलाताई सोनखासकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रसंतांच्या विचारांतून राष्ट्रनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा संदेश यावेळी दिला जाणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयदीप सोनखासकर, रामकृष्ण खोपे, गजानन उंबरकर, सौख्य वानखेडे यांच्यासह भूमिपुत्र फाउंडेशन, वासुदेव गोशाळा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ प्रयत्नशील आहेत.
शहीदांचे स्मरण हे केवळ औपचारिकता नसून राष्ट्रप्रेमाच्या संस्कारांचे पुनरुज्जीवन असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. समाजात एकात्मता, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा रुजविणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
