मुर्तिजापूर तालुक्यातील उपक्रमाचा सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी ठसा; सेवाभावी शिक्षकांच्या प्रयत्नांना यश
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मुर्तिजापूर : शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या ग्रामीण भागातील होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या ‘प्रकाशवाट’ प्रकल्पाने यंदाही उल्लेखनीय यश मिळवले आहे. सुपर 50/2.0 अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय मोफत मार्गदर्शन उपक्रमातून यंदा तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा उद्देश ग्रामीण भागातील गरीब पण गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या वर्षात तालुक्यातील सुमारे 40 गावांमधून निवडलेल्या 50 विद्यार्थ्यांना दर शनिवार-रविवारी मोफत प्रशिक्षण दिले जाते.या उपक्रमात जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक स्वतःची सुट्टी देऊन विद्यार्थ्यांना शिकवतात, ही विशेष बाब आहे. वर्षभर चालणाऱ्या सुमारे 80 दिवसांच्या प्रशिक्षणात 10 सराव चाचण्यांद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी अधिक भक्कम केली जाते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणून यंदा तालुक्यात निवड झालेल्या सहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी हे सुपर 50 मधीलच आहेत.नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सक्षम कांबळे, संविधान चंद्रमणी तायडे आणि माही डाबेराव यांचा समावेश असून, त्यांनी आपल्या कुटुंबासह तालुक्याचा मान उंचावला आहे.
या उपक्रमाला स्थानिक आमदार हरिष पिंपळे यांचे सहकार्य लाभत असून, गजानन महाराज बहुद्देशीय संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. तसेच समाजातील दानशूर व्यक्तींकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्त्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.शिक्षण विभाग, तालुका शिक्षण समन्वय समिती, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विशेषतः गणित शिक्षक पवन बोळे यांच्या योगदानामुळे हा उपक्रम यशस्वी ठरत आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींचे दार खुले झाले आहे.प्रकल्पाचे अध्यक्ष अविनाश बांबल यांनी सांगितले की, हा उपक्रम यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून 2026 साठी सुपर 50 निवड चाचणी 5 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. आतापर्यंत 300 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.‘प्रकाशवाट’ प्रकल्प हा केवळ शैक्षणिक उपक्रम नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

