अंजनगाव सुर्जीच्या सुरज मुरकुटे यांची शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रभावी भूमिका; शिवजन्मोत्सव महानाट्याला हजारो शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती : शहरातील गाडगे नगर येथील श्री संत गाडगेबाबा संस्थानच्या भव्य प्रांगणात राजमाता जिजाऊ फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा प्रेरणादायी इतिहास भव्य महानाट्याच्या माध्यमातून सादर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून महानाट्याला सुरुवात करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आमदार सुलभाताई खोडके, विधानपरिषद आमदार संजयजी खोडके, यशदादा खोडके, बिग बॉस फेम रोशन भजनकर यांची उपस्थिती होती. तसेच २०२६ च्या अमरावती भूषण पुरस्कारासाठी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कु. स्वाती गाडे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. हेमंत मुरके, क्रीडा क्षेत्रातील समर्थ मारोडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते मुकुंद मोरे यांच्यासह परिसरातील नगरसेवक व अनेक मान्यवर उपस्थित होते.
या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका अंजनगाव सुर्जी येथील सुरज मनोहर मुरकुटे यांनी प्रभावीपणे साकारली. त्यांच्या अभिनयाला उपस्थित शिवप्रेमींनी जोरदार दाद दिली.
राजमाता जिजाऊ मल्टीपर्पज फाउंडेशन व आर.जे. ग्रुपच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून शिवजन्मोत्सवाचा हा भव्य कार्यक्रम आयोजित केला जात असून, यंदाही ही परंपरा कायम ठेवण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष भूषण इंगळकर, उपाध्यक्ष अभिजीत भिवापूरे, सचिव कुणाल यावलीकर, विपुल इंगोले, तन्मय मोहोळ तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने गेल्या महिनाभर अथक परिश्रम घेतले.

