बाजार शुल्कासह सुमारे ९.९९ लाखांची थकबाकी ; ‘अ’ वर्ग परवाना धारकाविरुद्ध सिटी पोलिसांत तक्रार
Vidarbha Editor Milind Jamnik
Ak/मुर्तिजापूर – कृषी उत्पन्न बाजार समिती, मुर्तिजापूर येथे धान्य खरेदी व्यवहारातून सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांच्या उलाढालीवर आकारण्यात येणारे बाजार शुल्क व शासनाची देखरेख फी न भरता संबंधित ‘अ’ वर्ग परवाना धारक खरेदीदार पसार झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजार समितीचे सचिव रितेश मडगे यांनी सिटी पोलीस ठाणे, मुर्तिजापूर येथे लेखी तक्रार दाखल करून फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित खरेदीदाराने अडत्यांमार्फत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनसह इतर धान्याची खरेदी केली. मागील तीन महिन्यांत तब्बल ४५२८.६६ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. या व्यवहाराची एकूण रक्कम सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नियमांनुसार बाजार समितीचे बाजार शुल्क (०.५ टक्के) आणि शासनाची देखरेख फी (०.५ टक्के) भरणे बंधनकारक असताना संबंधित खरेदीदाराने ही रक्कम अदा केली नाही. बाजार शुल्क, देखरेख फी व कटा-मापाई शुल्क मिळून सुमारे ९ लाख ९९ हजार ५६५ रुपयांची थकबाकी असल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
जानेवारी २०२६ पर्यंत संबंधितांना वारंवार सूचना देण्यात आल्या. “कंपनीकडून पैसे मिळाल्यानंतर रक्कम भरू,” असे आश्वासन देत वेळकाढूपणा केल्याचा आरोप आहे. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी बाजार समितीत झालेल्या बैठकीत २० फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण रक्कम भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर संबंधितांचे मोबाईल फोन बंद आढळले. घरी चौकशी केली असता त्यांनी ठिकाण सोडल्याचे समजल्याने संशय अधिक बळावला.
तक्रारीनुसार, अडत्यांमार्फत शेतमाल ताब्यात घेऊन बाहेर विक्री करण्यात आली; मात्र बाजार समिती, शासन व अडत्यांचे पैसे न भरता आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे शेतकरी, अडते आणि बाजार व्यवस्थेवर परिणाम झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
सचिवांनी संबंधित परवाना धारक खरेदीदाराविरुद्ध गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी तसेच बाजार समिती, शासन, अडते व शेतकऱ्यांची थकबाकी तातडीने वसूल करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
______________________________
याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसात तक्रार प्राप्त झाली. तथापि, हे प्रकरण एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याने ते आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येईल.
अजित जाधव, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे, मूर्तिजापूर
