Gavakadachibatmi•भोवळ आली... पण स्वप्न थांबले नाही...!

 

परिक्षा


प्रशासनाच्या संवेदनशील निर्णयामुळे रुग्णालयातच पार पडली बारावीची परीक्षा





योग्य वेळी योग्य निर्णय ; एका विद्यार्थिनीच्या भविष्याला मिळाला नवा श्वास 


विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

मूर्तिजापूर : बारावीच्या महत्त्वाच्या परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावरच भोवळ येऊन विद्यार्थिनी बेशुद्ध पडली; मात्र प्रशासन, परीक्षा केंद्र आणि आरोग्य यंत्रणेच्या समन्वयामुळे तिने चक्क रुग्णालयातूनच गणिताचा पेपर दिला. मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे घडलेल्या या घटनेमुळे एका विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष वाचले.

          हिरपूर येथील अनंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेजमध्ये २१ फेब्रुवारी रोजी इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर सकाळी ११ वाजता सुरू होणार होता. विद्यार्थी १०.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. याचदरम्यान श्रेया गुणवंत देशमुख (बैठक क्र. व्हीओ १४९८६) हिची प्रकृती अचानक बिघडली. सुमारे १०.५० वाजता तिला भोवळ येऊन ती बेशुद्ध पडली.

परीक्षा केंद्रावरील कर्मचारी व पालकांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तिच्या परीक्षेबाबत काय करता येईल यासाठी परिरक्षक केंद्राशी संपर्क साधण्यात आला. विभागीय अध्यक्ष संदीप सांगवे यांच्याशी दूरध्वनीवरून मार्गदर्शन घेण्यात आले. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

सुमारे ११.४० वाजता अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनीशी चर्चा केली. तिची प्रकृती स्थिर असल्याची खात्री करून ती परीक्षा देण्याच्या मनस्थितीत आहे का, याची विचारपूस करण्यात आली. विद्यार्थिनीने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर तातडीने हालचाली सुरू झाल्या.

लगतच्या श्री गाडगे महाराज विद्यालय, मूर्तिजापूर येथून गोपनीयतेचे सर्व नियम पाळून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका महिला पोलिसांच्या बंदोबस्तात ११.५० वाजता रुग्णालयात पोहोचविण्यात आल्या. महिला पोलिस कर्मचारी सरला पारोदे व पर्यवेक्षक ढोकणे यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली. तसेच परिरक्षक तथा गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके व उपपरिरक्षक मोहम्मद इब्राहीम अली यांनी स्वतः उपस्थित राहून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत विद्यार्थिनीला पेपर देण्यासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून दिले.

या सर्व समन्वयामुळे विद्यार्थिनीने रुग्णालयातूनच पेपर पूर्ण केला. योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे तिचे एक वर्ष वाया जाण्यापासून वाचले.

विद्यार्थिनीच्या पालकांनी विभागीय अध्यक्ष संदीप सांगवे यांच्यासह संबंधित अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. उपस्थितांनीही प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक केले. “योग्य वेळ आणि योग्य निर्णय” याचे हे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post