मूर्तिजापूर - वैयक्तिक यशामागे केवळ स्वतःची मेहनत नसून समाजातील विविध घटकांचे सहकार्य, मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच आम्ही सर्वजण समाजातील लाखो मदतीच्या हातांमुळे आज या स्थानापर्यंत पोहोचलो आहोत, असे भावनिक प्रतिपादन अनिल किलोर यांनी केले.
तालुक्यातील शेलू वेताळ येथे आयोजित शासकीय सेवा व योजनांच्या भव्य महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक सुशिक्षित नागरिकाने आपल्या मूळ गावी जाऊन वेळ देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान दिल्यास ग्रामीण भागात सकारात्मक व मोठा बदल घडू शकतो. “सर्वजन सुखाय, सर्वजन हिताय” हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमात लेझीम पथकाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. भारतीय संस्कृतीनुसार पारंपरिक दीपप्रज्वलनाऐवजी पर्यावरणपूरक पद्धतीने रोपट्याला पाणी अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांना वृक्ष व अश्व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
महामेळाव्यात विविध शासकीय विभागांच्या सुमारे ४० केंद्रांची पाहणी करण्यात आली. लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, दाखले, आदेश व साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा महामेळावा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मूर्तिजापूर तालुका विधी सेवा समिती तसेच अकोला जिल्हा वकील संघ व मूर्तिजापूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या तथा अकोला पालक न्यायमुर्ती उर्मिला जोशी-फलके, मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे, माजी न्यायमूर्ती संजय मेहरे, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, न्यायाधीश आसिफ तांबोळी, आमदार हरिष पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे,अॅड मोतीसिंह मोहता व अॅड अजय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रस्ताविक अॅड. सुनील कांबे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
-----------------------------------------------
न्यायमूर्ती किलोर यांच्याकडून उपक्रमांचे कौतुक
महामेळाव्याच्या आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे नमूद करून न्यायमूर्ती किलोर यांनी त्यांचे कौतुक केले.
शेलू बोंडे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सतीश वसु यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम पथनाट्यातून ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’, पर्यावरण संवर्धन, बालविवाह निर्मूलन, अपंग समावेशित शिक्षण, रस्ता सुरक्षा व स्वच्छता याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. तसेच जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र, अकोला यांच्या वतीने “बाई पण भारी देवा” या विषयावर सादर केलेल्या पथनाट्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
------------------------------------------------------
" प्रकाशवाट " प्रकल्पातून विद्यार्थ्यांना मदत
ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “प्रकाशवाट” प्रकल्पांतर्गत जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सुपर ५० निवड चाचणीपूर्व परीक्षेदरम्यान आमदार हरिष पिंपळे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याचेही यावेळी दिसून आले.


