मूर्तिजापूर – ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दूध उत्पादन क्षेत्र बळकट करणे आवश्यक असून शेतकरी व दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार हरिष पिंपळे यांनी दिली. ते अकोला जिल्हा दूध उत्पादक संघाच्या मासिक बैठकीत बोलत होते.
बैठकीत केंद्र व राज्य शासन तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध दूध उत्पादनवाढीच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवण्यासाठी प्रशासन स्तरावर ठोस प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार पिंपळे यांनी दिले.“दूध उत्पादन क्षेत्र मजबूत झाले तर ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रशांत हजारी यांनी दूध उत्पादक संस्था व शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले. जे शेतकरी दूध उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत आहेत किंवा ज्यांचे उत्पादन बंद आहे, त्यांनी तातडीने उत्पादन सुरू करावे. शासनाच्या अनुदान व प्रोत्साहन योजनांचा लाभ घ्यावा तसेच संघटनात्मक स्तरावर सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले. दूध उत्पादनात वाढ झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत उपाध्यक्ष शिवा मोहाड, सदस्य नाना भिसे, राहुल गांधी, साहेबराव जाधव, अन्सार खाँ, ब्रह्म पांडे (अकोट), नूतन हरिष पिंपळे, वंदना आगे, व्यवस्थापक गोविंदराव आगे, सहायक शाम पांडे, तसेच शासकीय दूध व्यवस्थापक सोळंके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक गोविंदराव आगे यांनी केले तर आभार प्रदर्शन साहेबराव जाधव (घोटा) यांनी मानले. बैठकीचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना योजनांची माहिती पोहोचवणे, प्रत्यक्ष लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे, निष्क्रिय दूध उत्पादक संस्थांना पुन्हा सक्रिय करणे आणि उत्पादनवाढीस चालना देणे हा होता. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील दूध व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

