हमीभावाचा कायदा तातडीने लागू करा ; पीककर्ज माफी व वन्यप्राणी नुकसानभरपाईसाठी ठोस धोरणाची मागणी
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - येथील जनमंच व प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या मार्फत देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून अत्यंत तणावपूर्ण जीवन जगत आहे. यावर्षी शेतमालाला हमीभावापेक्षा एक हजार ते दीड हजार रुपये कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची कर्जफेड करण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे शेतमालाला कायदेशीर हमीभाव देणारा कायदा तातडीने लागू करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच, शेतकऱ्यांकडील चालू व थकीत पीककर्ज सरसकट माफ करून त्यांना आर्थिक उभारी द्यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीला ‘राष्ट्रीय हानी’ म्हणून घोषित करावे आणि शेतकऱ्यांसाठी पंधरा वर्षांच्या दीर्घमुदतीचे शेतकुंपण धोरण तयार करण्याचे निर्देश नाबार्ड व रिझर्व्ह बँकेला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.
याशिवाय, पीकविमा योजना अधिक शेतकरीभिमुख करण्यासाठी आवश्यक बदल करण्यात यावेत, असेही निवेदनात नमूद आहे.
या निवेदनावर राजूभाऊ वानखडे, प्रा. सुधाकर गौरखेडे, कैलास साबळे, मन्ना नाईकनवरे, नंदकिशोर बबानिया, पंकज कांबे, निखिल गावंडे, अनिल देवगिरकर, नंदकिशोर महल्ले, श्रीकृष्ण गुल्हाने, प्रफुल्ल मालधुरे, अरुण गावंडे, हरिभाऊ वानखडे, छोटूभाऊ बोंडे, प्रशांत गावंडे, जयेश टाले, पंजाबराव गावंडे, प्रकाश अंबुलकर, उमेश वरनकर, अरुण बोंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Tag : #मूर्तिजापूर #शेतकरी #कृषी #पंतप्रधानांना_साकडे #शेतकरी_समस्या #कृषी_कायदा #आत्मनिर्भर_भारत #शेतकरी_आत्महत्या #किसान #अकोला #मराठवाडा #महाराष्ट्र_कृषी #कृषी_उत्पादन #शेतकरी_योजना #नरेंद्र_मोदी

