चाळणी झालेल्या रस्त्यातून करावा लागतो जीवघेणा प्रवास..
श्रीकांत राऊत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
करंजखेड ते महागाव या मुख्यमार्गाची अक्षरशः वाट लागली असून अवघ्या पाच किलोमीटर अंतरात जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दोन दिवसा पूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने रस्त्याची अक्षरच्या दैनावस्था उघड झाली.
रविवार आणि सोमवार या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असून खड्डे दिशेने असे झाले आहेत. परिणामी अपघाताचा धोका उद्भवत आहे. या मार्गावर जुनूना, करंजखेड, कासारबेहळ, सेवानगर, हिवरा (संगम) आदी सुमारे दहा गावातील नागरिकांना दैनंदिन येजा करावी लागते. उद्योग, व्यवसाय, शाळा, महाविद्यालय, नोकरी तसेच रुग्णालयात कामासाठी हजारो नागरिकांना महागाव येथे यावे लागते. मात्र खड्डेमय रस्त्यामुळे या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. रात्रीच्या दरम्यान रस्त्यावर वाहन चालवितांना सदर खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे आणि अरुंद झालेला मार्ग अपघातांना आमंत्रण देत आहे. दोन वाहने या रस्त्या वरून समोरा समोर आल्यानंतर एकाला खड्ड्यात आपले वाहन टाकावे लागते. परिणामी वाहनाचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाहन धारकातून वर्तविल्या जात आहेत.खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रम करतांना प्रवाशांना दुखापतीचे प्रकार वाढले आहेत.नुकतेच या मार्गावर पुलाची दुरुस्तीचे काम करण्यात आले परंतु सदर काम अर्धवट स्थितीत असून रस्ताही जीर्ण झाला आहे. पुलाचे काम पूर्ण होण्याआधी या ठिकाणी खड्डे आणि पुलाला तडे गेले आहेत. या मार्गा वरून अवैध रेती, माती गौणखनिज वाहने प्रचंड प्रमाणात धावतात. अवजड वाहनाच्या प्रचंड वाहतुकीमुळे रस्त्याची वाताहत झाली आहे.
या मार्गावरून श्रीक्षेत्र माहूर कडे जाणाऱ्या भक्तांच्या दिंड्या मार्गक्रम करीत असतात. त्यामुळे भक्तजन, शालेय विद्यार्थी, रुग्ण, या मार्गावरील दहा खेडी,तांड्यातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागणार असल्याचा इशारा शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख भीमराव भालेराव यांनी दिला.
