कंझऱ्याच्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा यशस्वी प्रयोग ; आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने २५ टन उत्पादन
मूर्तिजापूर : तालुक्यात पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून फळबाग आणि बागायती शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अल्प क्षेत्रात नियोजनबद्ध शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भरघोस उत्पन्न मिळू शकते, याचा प्रत्यय कंझरा येथील निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप महादेव नागोलकर आणि त्यांचे कृषी पदवीधर पुत्र मंगेश नागोलकर यांच्या यशातून आला आहे. अवघ्या दीड एकर क्षेत्रात टरबूज लागवड करून त्यांनी साडेपाच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळविले आहे.
नोकरीदरम्यानही शेतीची आवड जोपासणाऱ्या दिलीप नागोलकर यांनी निवृत्तीनंतर पूर्णवेळ शेतीकडे लक्ष केंद्रित केले. त्यांचे पुत्र मंगेश यांनी बी.एस्सी. (अॅग्री) शिक्षण पूर्ण करून गावातच कृषी केंद्र सुरू केले असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मजुरांची कमतरता आणि पावसाचे अनिश्चित स्वरूप लक्षात घेता त्यांनी फळपिकांचा पर्याय निवडला.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील ‘विघ्नहर्ता नर्सरी’मधून ‘राशी’ जातीची सुमारे १० हजार टरबूज रोपे सुमारे २५ हजार रुपयांत खरेदी करण्यात आली. पिकाच्या वाढीसाठी उत्तम प्रतीचे कुजलेले शेणखत वापरण्यात आले. थंडीच्या काळात पिकाला बहर यावा यासाठी तीन ते चार वेळा फवारणी करण्यात आली. पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
-------------------------------------------
२५ टन उत्पादन ; दिल्ली बाजारपेठेत विक्री
पहिल्या तोड्यात १८ ते २० टन उत्पादन मिळाले, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी ५ टन टरबूजाचे उत्पादन झाले. एकूण सुमारे २५ टन उत्पादन घेण्यात यश आले. अकोला-अमरावती येथील व्यापाऱ्याने बांधावरच २३ ते २५ रुपये प्रतिकिलो दराने टरबूज खरेदी केली. ही टरबूजे थेट दिल्लीच्या बाजारपेठेत पाठविण्यात आली.
संपूर्ण लागवडीसाठी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च आला. खर्च वजा जाता साडेपाच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाल्याने नागोलकर कुटुंबाचा आत्मविश्वास दुणावला आहे.
____________________________
फळबागेला येणार सुवर्णकाळ
“आज प्रत्येकाच्या आहारात फळांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भविष्यात फळबाग शेतीला निश्चितच चांगले दिवस येतील. पारंपरिक शेतीसोबत शेतकऱ्यांनी थोड्या प्रमाणात तरी फळबाग लागवड करावी,” असे मत दिलीप नागोलकर यांनी व्यक्त केले.
दिलीप नागोलकर यांच्याकडे एकूण १४ एकर बागायती व फळबाग क्षेत्र असून, त्यापैकी दीड एकरात टरबूजाची लागवड करण्यात आली. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी प्रेरित झाले असून, काहींनी टरबूज लागवडीकडे पावले उचलली आहेत.
अल्प क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य नियोजन केल्यास शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळविता येते, हे नागोलकर पिता-पुत्रांनी सिद्ध करून दाखविले आहे.

