विषमुक्त व शाश्वत शेतीकडे मूर्तिजापूर तालुक्याची ठाम वाटचाल
मूर्तिजापूर - तालुक्यातील विविध गावांतील तब्बल ७५ शेतकऱ्यांनी नैसर्गिक आणि शाश्वत शेतीचा संकल्प करत तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. दि. २० ते २२ दरम्यान कृषी विज्ञान केंद्र, बडनेरा येथे आयोजित शिबिरात कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या तंत्रज्ञानासह विषमुक्त अन्नधान्य निर्मितीचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
हे प्रशिक्षण पाणी फाउंडेशनच्या अभ्यासू आणि ध्येयवादी टीमच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या उपक्रमाला कृषी विभाग, उमेद, आत्मा विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणांचा सक्रिय सहभाग लाभला.
प्रशिक्षणादरम्यान रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीची घटती सुपीकता, पाण्याचे प्रदूषण, अन्नधान्यात वाढणारे विषारी अंश आणि त्यातून उद्भवणारे आरोग्यधोके यावर सखोल चर्चा झाली. निसर्गाची साखळी विस्कळीत झाल्यास शेती बंजर होण्याचा धोका वाढतो, याची जाणीव तज्ज्ञांनी करून दिली.कमी खर्चिक, स्थानिक साधनसामग्रीवर आधारित आणि पर्यावरणपूरक शेतीपद्धती अवलंबणे ही काळाची गरज असल्याचा ठाम संदेश या वेळी देण्यात आला.
शिबिरात सेंद्रिय खतनिर्मिती, जैविक कीडनियंत्रण, पीक नियोजन, जलसंधारण आणि मृदसंवर्धन यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. “उत्पादन वाढवताना निसर्गसंतुलन राखणे आणि विषमुक्त अन्नधान्याला चालना देणे” हा उपक्रमाचा गाभा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.या उपक्रमासाठी ग्रामपुत्र परिवाराने पुढाकार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे काम केले. नव्या उमेदीनं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
मूर्तिजापूर तालुक्यातील ही शेतकरी चळवळ भविष्यात विषमुक्त अन्ननिर्मिती, निरोगी समाज आणि समृद्ध शेतीसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

