आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत " जल अर्पण दिवस " ; देखभाल आता ग्रामस्थांकडे
मूर्तिजापूर - पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत धानोरा वैद्य येथील जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे आमदार हरिष पिंपळे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीकडे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले. यानिमित्त " जल अर्पण दिवस " उत्साहात साजरा करण्यात आला. यापुढे या योजनेची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ग्रामस्थ तसेच ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे सोपविण्यात आली आहे.
अकोला जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या निर्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, सरपंच पंकज वैद्य, उपअभियंता विनोद गिरी, विस्तार अधिकारी राहुल उंद्रे,शाखा अभियंता गौतम झाडे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राजेश डहाके, मनुष्यबळ विकास सल्लागार प्रवीण पाचपोर, पाणी गुणवत्ता सल्लागार ममता गणोदे तसेच शासकीय कंत्राटदार श्री. पारखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात आमदार पिंपळे यांच्या हस्ते युवतीजवळील कलशामध्ये जल भरून " जलबंधन " उपक्रमाने करण्यात आली. पाण्याच्या टाकीजवळ हा विधी पार पडला. त्यानंतर गावातून फेरी काढण्यात आली व ग्रामपंचायत कार्यालयासमोर जलपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता अतुल साळुंके यांनी केले.
यानंतर योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले. जल जीवन मिशनचे प्रविण प्रशिक्षक, जलदूत समाधान इंगळे, आकांक्षा वानखडे आणि सीआरपी शारदा नाईक यांनी मनोगत व्यक्त करत पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत अधिकारी ऋषिकेश अनभोरे, देवानंद वजीरे, प्र. मुख्याध्यापक गजानन मिसाळकर, ग्रामपंचायत अधिकारी दिपक मते, विशाल गावंडे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आदींनी पुढाकार घेतला. यावेळी जलसुरक्षक श्री. बुरघाटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जल अर्पण दिवस’ कार्यक्रमात जलपूजन, जलबंधन तसेच भारुडाच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व विशद करण्यात आले. पाच महिलांनी रासायनिक व जैविक पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता वैद्य यांनी केले. कार्यक्रमाला गावातील विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ व ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



